News Flash

नागपूर अधिवेशनात सर्वाधिक २८ दिवस कामकाज!

नागपूरमध्ये फक्त हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाते.

नागपूरमध्ये फक्त हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाते. नागपूर करारात तशी तरतूद आहे का?

– हिवाळी अधिवेशन नागपूर या उपराजधानीमध्ये भरविण्याची परंपरा रूढ झाली. पण नागपूर करारात विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूरमध्ये भरविले जाईल, अशी तरतूद आहे. शक्यतो हिवाळ्यात नागपूरमध्ये अधिवेशन भरविणे योग्य ठरते. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मुंबईत होते. पावसाळी अधिवेशनही मुंबईतच घेतले जाते. यामुळेच वर्षांतील अखेरचे अधिवेशन नागपूरमध्ये होते. नागपूरमध्ये आतापर्यंत विधानसभेची ५४ अधिवेशने पार पडली आहेत.

हिवाळी अधिवेशन वगळता अन्य अधिवेशने नागपूरमध्ये झाली आहेत का?

– होय. १९६१ मध्ये १४ जुलैपासून पावसाळी तर १९७१ मध्ये ६ सप्टेंबरपासून पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये झाल्याची नोंद आहे. १९८० मध्ये पहिले म्हणजे जानेवारी महिन्यात व तिसरे अशी दोन अधिवेशने नागपूरमध्ये झाली होती. १९८६ मध्येही पहिले अधिवेशन जानेवारी महिन्यात तर चौथे अधिवेशन डिसेंबर महिन्यात उपराजधानीमध्ये झाले होते. १९८९ मध्ये हिवाळी अधिवेशन ऑक्टोबर महिन्यात झाले होते. नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन सुरू होते. पण एकदा त्यालाही अपवाद करण्यात आला होता. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनीही एक वर्ष पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची योजना आखली होती. पण त्याला काँग्रेस पक्षाच्या विदर्भातील नेत्यांनी विरोध दर्शविला होता.

सर्वाधिक किती दिवस आणि केव्हा अधिवेशन झाले?

– हिवाळी अधिवेशन तीन आठवडय़ांचे असते. काही वेळा एकूण कालावधी जास्त काळ झाला असला तरी सुट्टय़ांमुळे प्रत्यक्ष कामकाज कमी होते. आतापर्यंत सर्वाधिक २८ दिवस विधानसभेचे अधिवेशन हे १९६८ मध्ये झाले आहे. अधिवेशनाचा एकूण कालावधी महिनाभरापेक्षा जास्त असला तरी प्रत्यक्ष कामकाज हे २८ दिवस झाले होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर झालेले अधिवेशन हे २७ दिवस चालले.  १९७१ मध्ये प्रत्यक्ष २६ दिवसांचे कामकाज झाले होते. आतापर्यंत तीन अधिवेशने २५ दिवस चालली. १९७३ मध्ये विधानसभा आणि विधान परिषद या उभय सभागृहांचे कामकाज २५ दिवस झाले होते. विधान परिषदेचे सर्वाधिक २५ दिवसांचे कामकाज  १९७३ मध्ये नागपूरमध्ये झाले आहे.  उर्वरित अधिवेशने ही १० ते १५ दिवसांच्या कालावधीत झाली आहेत.

सर्वात कमी काळाचे अधिवेशन कधी आणि किती दिवस झाले?

– सर्वात कमी काळाचे अधिवेशन हे पाच दिवसांचे १९८९ मध्ये झाले होते. १६ ते २० ऑक्टोबर असे पाच दिवस सलग अधिवेशन झाले होते. १९९२ मध्ये सहा दिवसांत अधिवेशन गुंडाळण्यात आले होते. बाबरी मशीद पाडण्यात आल्यावर त्याची देशभर हिंसक प्रतिक्रिया उमटली होती. तेव्हा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होते. दुसऱ्याच दिवशी गोंधळात अधिवेशन गुंडाळण्यात आले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर नोव्हेंबर १९८४ मध्ये झालेले अधिवेशन हे सहा दिवसांत गुंडाळण्यात आले होते.

नागपूरमध्ये आतापर्यंत किती अधिवेशने पार पडली आहेत?

– उपराजधानीमध्ये आतापर्यंत ५४ अधिवेशने पार पडली आहेत. दोन वेळा वर्षांतील दोन अधिवेशनेही झाली आहेत. यंदाचे हिवाळी अधिवेशन हे ५५वे अधिवेशन आहे.

संकलन – संतोष प्रधान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2016 1:45 am

Web Title: nagpur winter session 2016 3
Next Stories
1 अधिवेशन केवळ औपचारिकता, फार काही लाभ नाही
2 दरवर्षी तेच ते मोर्चे !
3 पगाराचा दिवसही कोराच!
Just Now!
X