18 October 2018

News Flash

शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनाच्या केंद्रस्थानी!

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा इतिहास पाहिला तर तो वादळी आहे. राजकीय उलथापालथींचा आहे.

बंदोबस्तासाठी राज्यातून नागपुरात आलेली पोलीस वाहने

चर्चेसाठी शंभरावर ठराव आणि प्रस्ताव

सोमवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचे प्रश्नच अग्रस्थानी राहणार असल्याचे या विषयांवर विधिमंडळ सचिवालयाकडे दाखल झालेल्या प्रस्ताव, चर्चा आणि लक्षवेधींच्या संख्येवरून दिसून येते. सरासरी शंभरावर चर्चा आणि ठराव या विषयांवर आहेत.

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा इतिहास पाहिला तर तो वादळी आहे. राजकीय उलथापालथींचा आहे. छगन भुजबळ यांचा सेनेतून काँग्रेस प्रवेश हा नागपूर अधिवेशनातलाच. अशाच प्रकारची इतरही अनेक उदाहरणे आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वादळी चर्चाही याच अधिवेशनात घडून आल्या आहेत. कधी कर्जमाफीचा मुद्दा असो किंवा संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी असो, या मुद्यावर सभागृह विरोधकांनी बंद पाडण्याचाही इतिहास आहे. गेल्यावर्षी सरसकट कर्जमाफीचा मुद्दा गाजला होता. यंदा ऑनलाईन कर्जमाफीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. त्याशिवाय नापिकी, शेतमालाचे पडलेले भाव आणि शेतकऱ्यांचे इतरही प्रश्न आहेत. यावर चर्चा करण्यासाठी सदस्यांनी ठराव, चर्चेचे प्रस्ताव दिले आहेत. आतापर्यंत तीन हजारांवर लक्षवेधी सूचना दाखल झाल्या आहेत. अर्धा तास चर्चा आणि ठरावाचे प्रस्ताव शंभरावर आहेत. यातील बहुतांश प्रस्ताव हे कर्जमाफी, कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू, बोंडअळीमुळे झालेले नुकसान, कापूस, सोयाबीनचे पडलेले भाव आणि तत्सम विषयांवर आहेत. कर्जमाफीच्या संदर्भात सदस्यांनी सहकार विभागाकडून माहिती घेणे सुरू केले आहे.

अधिवेशनाच्या आठ दिवसाआधीच राष्ट्रवादीने हल्लाबोल दिंडी यवतमाळहून सुरू केली असून ती १२ तारखेला नागपुरात दाखल होणार आहे. या यात्रेत शेतकरीच केंद्रबिंदू आहे. काँग्रेसने आयोजित केलेल्या मोर्चातही शेतकऱ्यांचेच विषय निवडण्यात आले आहे. याचे प्रतिबिंब अधिवेशनात हमखास उमटेल, असे सध्याचे चित्र आहे. या विषयावर प्रसंगी अधिवेशनाचे कामकाज रोखू, असा इशारा यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला आहे.

विधानसभा

  • लक्षवेधी सूचना २१०३
  • अर्धा तास चर्चा २०९

विधान परिषद

  • लक्षवेधी       ८०६
  • अर्धा तास चर्चा ४७
  • ठराव        ५२

First Published on December 8, 2017 3:26 am

Web Title: nagpur winter session farmers issue