चंद्रशेखर बोबडे

नागपुरी संत्री अशी खास ओळख असलेल्या संत्र्याला देशविदेशात असलेली मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने बांगलादेशात रेल्वेद्वारे संत्री पाठवण्याचे नियोजन केले. मात्र तेथील स्थानकावर ३० डब्यांची गाडी उभी राहू शकेल इतका मोठा फलाट नसल्याने या संत्र्यांचा बांगलादेशपर्यंत होणारा रेल्वे प्रवास अद्याप सुरू झालेला नाही.

बांगलादेशात नागपुरी संत्र्याची मोठी मागणी आहे. सध्या रस्तेमार्गाने संत्री पाठवली जातात, परंतु त्याला खर्च अधिक येतो. रेल्वेद्वारे संत्री पाठवल्यास वाहतूक खर्च २० ते ३० टक्क्याने कमी होईल व वेळेचीही बचत होईल. तसेच यामुळे संत्री उत्पादकांनाही अधिक पैसे मिळतील, या उद्देशाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नातून महाऑरेंजच्या मदतीने बांगलादेशात रेल्वेद्वारे संत्री पाठवण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांची बैठकही गडकरी यांच्या निवासस्थानी पार पडली होती.

यासंदर्भात महाऑरेंजचे सल्लागार श्रीधर ठाकरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, आमची सर्व तयारी झाली आहे. फक्त बोनापोलमध्ये फलाटाची सोय नसल्याने काम थांबले आहे. ते पूर्ण झाल्यावर संत्री पाठवली जातील. दरम्यान, गडकरी यांच्याच प्रयत्नाने दिल्लीकडे जाणारी किसान रेल सुरू झाली. त्याद्वारे दिल्ली येथे सध्या संत्री पाठवली जात आहेत. त्यामुळे मागणी वाढली असून शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत आहे. या रेल्वेद्वारे शेतकरी स्वत: संत्री पाठवू शकतात याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.

झाले काय?

सरासरी ३० डब्यांची गाडी भरून संत्री बांगलादेशातील बेनापोल येथे पाठवली जाणार होती. मात्र ज्या स्थानकावर गाडी संत्री घेऊन जाणार होती तेथे संत्री उतरवण्यासाठी आवश्यक फलाट नाही. वरूड येथे संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे. तेथून ही गाडी बांगलादेशमध्ये जाणार होती. त्यासाठी वरूड येथे फलाट बांधण्यात आला, मात्र हेच काम बांगलादेश सरकार तातडीने करू शकले नाही.

बांगलादेशमध्ये रेल्वेद्वारे संत्री पाठवली जाणार आहेत, मात्र तेथील सरकारने अद्याप पुरेशी तयारी केली नाही. ज्या स्थानकावर गाडी जाणार आहे तेथे ३० डब्यांची गाडी उभी राहू शकेल इतका मोठा फलाट नाही. त्यामुळे विलंब होत आहे.

– श्रीधर ठाकरे, सल्लागार, महाऑरेंज.