तीन हजारांपेक्षा अधिक गटारांवर झाकणे नाहीत

नागपूर : मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे उघडय़ा गटारांत पडून अनेकांनी जीव गमावल्यानंतर नागपुरातील उघडय़ा गटारांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध भागात आयआरडीपी, महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासचे एकूण ३८ हजार गटारे आहेत. महापालिकांतर्गत विविध भागात सात हजारांवर गटारे  किंवा नाल्याचा काही भाग मोकळा असून पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी धोका निर्माण झाला आहे.

शहराचा झपाटय़ाने विस्तार होत असताना शहरातील समस्याही तेवढय़ाच गतीने वाढत आहेत. जागा मिळेल त्या जागी‘लेआऊट पाडल्याने किंवा अपार्टमेंट’ निर्माण झाल्यामुळे या समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे. मात्र, येथे अद्यापही नागरी सुविधा पुरवण्यात महापालिकेला यश आले नाही. आता पावसाळ्यात  उघडय़ा गटारांनी महापालिकेचा रक्तदाब वाढवला आहे.  काही ठिकाणी तर गटारांना कचराघर बनवल्यामुळे गेल्या दोन दिवसात पाणी तुंबून ते रस्त्यावर आले आहे.

वाठोडा, भांडेवाडी, नंदनवन, जागनाथ बुधवारी, धरमपेठ, लक्ष्मीनगर, मानेवाडा, हुडकेश्वर, रामदासपेठ, मानेवाडा, इतवारी, दहीबाजार आणि उत्तर व मध्य नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये गटारांची संख्या अधिक आहे. शहरात किमान तीन हजारांपेक्षा अधिक गटारांवर झाकणे नाहीत. जी आहेत ती तुटलेली किंवा बाजूला पडलेली आहेत.

शहराच्या अंतर्गत रस्त्यावरची स्थिती यापेक्षा वाईट आहे. सिमेंटीकरण व काही भागात डांबरीकरण केल्यानंतर रस्त्यावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी पदपथावर मेनहोल्स तयार करण्यात आले. पदपथाच्या खालून वाहणाऱ्या नाल्या स्वच्छ करण्याचा त्यामागचा हेतू होता. सध्या शहरातील अनेक पदपथांचीच अवस्था दयनीय आहे.  महाल, नबाबपुरा, जागनाथ बुधवारी, मंगळवारी, जुनी शुक्रवारी या भागातील मेनहोल्सवरील झाकणे जर्जर झाली आहेत. ती बदलवण्यासाठी म्हणून नागरिकांनी अर्ज-विनंत्या केल्या. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी, धोकादायक वळणावर आणि वर्दळीच्या रस्त्यावर धोका अधिक असतो. ही कामे पावसाळ्यापूर्वी करावी, असे आदेश नगरसेवक, महापौरांपासून तर आयुक्तांपर्यंत आणि सर्वच झोन सभापतींनी दिले. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच होत नाही.

 

झोननिहाय गटार उघडी   तुटलेली

१ लक्ष्मीनगर ३२५५   १०२०

२ धरमपेठ     ३११०   ८५०

३ हनुमानगर ३४२०   १३१०

४ धंतोली     २७६०   ११०४

५ नेहरूनगर  ३२१०   ९८०

६ गांधीबाग   २००    १४००

७ सतरंजीपुरा  २९४०   ७७३

८ लकडगंज्  २१००   ९३०

९ आशीनगर २५७०  ८९०

१० मंगळवारी २२७०  ७३०

झोन कार्यालयात तक्रारी करा

विविध भागातील मुख्य गटारांची दुरुस्ती करुन त्यावरील झाकणे लावण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले आहे. जुन्या भागात लोखंडाची  तर काही भागात सिमेंटची झाकणे आहेत. झोननिहाय सर्वेक्षण करून मेनहोलवरील झाकणे लावण्याचे काम सुरू आहे. ज्या भागात मेनहोल्सवर झाकणे नाहीत, तेथील नागरिकांनी झोनमध्ये तक्रारी कराव्या.

– डॉ. सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी, महापालिका.