25 October 2020

News Flash

ऑक्सफोर्डच्या लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरकर सरसावले

२२ तरुणांनी स्वत:हून मेडिकलशी संपर्क साधला

२२ तरुणांनी स्वत:हून मेडिकलशी संपर्क साधला

नागपूर : ऑक्सफोर्ड विद्यापीठात विकसित होणाऱ्या कोविशील्ड या करोनावरील लसीच्या मानवी चाचणीसाठी  सुमारे २२ तरुणांनी स्वत:हून मेडिकलमध्ये संपर्क साधल्याची माहिती आहे. पुण्याहून  या लसी मेडिकलमध्ये आल्यावर चाचणीसाठी नोंदीसह लस देण्याची प्रक्रिया सुरू होईल.

मेडिकलमध्ये सुमारे ६० ते १०० स्वयंसेवकांवर ही चाचणी होणार आहे. एकदा लस टोचल्यावर पुन्हा २८ दिवसांनी ती दुसऱ्यांदा टोचली जाणार आहे. पहिली लस दिल्यापासून सलग सहा महिने स्वयंसेवकांच्या आरोग्यावर मेडिकलचे डॉक्टर नजर ठेवणार आहेत. या काळात  स्वयंसेवकांच्या शरीरात प्रतिपिंड तयार होतात काय, त्याचे प्रमाण व इतरही गोष्टींवर  लक्ष ठेवले जाणार आहे. या लसी  एक ते दोन दिवसांत  मेडिकलला येणार आहेत. लसी पोहोचल्यावर इच्छुकांच्या विविध तपासण्याकरून चाचणीची प्रक्रिया  सात दिवसांत सुरू होण्याची शक्यता मेडिकलच्या डॉक्टरांकडून वर्तवली जात आहे. या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख व कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूचे प्रमूख डॉ. सुशांत मेश्राम यांच्याकडे आहे. ‘नेचर’ या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, ही लस माकडांवर पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. या प्रकल्पावर अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांचेही लक्ष आहे.

भारत बायोटेकच्याही लसींची चाचणी

डॉ. गिल्लुरकर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील केंद्रात स्वदेशी बनावटीची भारत बायोटेक, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा (एनआयव्ही), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांनी तयार केलेल्या लसीचीही दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे करोनावरील लसीची चाचणी करणारे मेडिकल हे शहरातील दुसरे केंद्र असणार आहे.

मेडिकल प्रशासन सातत्याने या प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रक्रियेसाठी ऑक्सफोर्डमधील  अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे.  येत्या दोन दिवसांत लसी मिळण्याची शक्यता असून  सात दिवसांत  स्वयंसेवकांची निवड करून प्रत्यक्ष लस देणे सुरू होईल. 

– डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 12:32 am

Web Title: nagpurkar ready for oxford vaccine human test zws 70
Next Stories
1 करोना रुग्णांवर जलद उपचार होणार – पालकमंत्री
2 ‘जम्बो हॉस्पिटल’ ऐवजी छोटय़ा रुग्णालयांवर भर द्या
3 राज्यातील ‘माफसू’च्या शिक्षकांबाबत शासनाचा दुजाभाव
Just Now!
X