देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आज शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने नागपूरकर अस्वस्थ झाले असल्याचे चित्र विविध गैरराजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियावरून दिसून येते. विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस आणखी पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी हवे होते, असा या प्रतिक्रियांचा सूर आहे.

अनेक वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात विदर्भाला आणि प्रथमच नागपूरला मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळाला होता. फडणवीस यांना सुद्धा नागपूर आणि विदर्भाविषयी आस्था होती. या भागातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी ‘आपला मुख्यमंत्री’ अशी भावना होती. राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्राशी त्यांचा निकटचा संबंध होता. पाच वर्षांत नागपूरच्या सर्वच क्षेत्रात झालेल्या विकासात त्यांचे योगदान अधिक असल्याचे मत या क्षेत्राचे आहे. महायुतीला बहुमत मिळाल्याने तेच पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. मात्र राजकारणाने वेगळेच वळण घेतले. त्यानंतर आज त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. याबाबत नागपूर शहरातील गैरराजकीय संघटना व विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रतिक्रिया घेतली असता त्यातून फडणवीस यांच्या राजीनाम्याविषयी हळहळ आणि अस्वस्थता व्यक्त केली. तसेच तेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी असावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

राज्याला पुन्हा गरज होती

‘‘एक उच्चशिक्षित आणि विविध क्षेत्रातील ज्ञान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून फडणवीस यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नागपूरसह विदर्भातील शैक्षणिक क्षेत्राचा विकास केला. त्यांच्या नेतृत्वाची या राज्याला पुन्हा गरज होती.’’

– डॉ. पंकज चांदे, माजी कुलगुरू, संस्कृत विद्यापीठ.

मुख्यमंत्रीपदाचे वाटप ही संकल्पनाच चुकीची

‘‘देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला असला तरी तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास आहे. ते नागपूरकर असल्याचा आम्हाला अभिमान आहे. ते शांत, संयमी व लढाऊ सुद्धा आहेत आणि तेच राज्याचा कारभार सांभाळू शकतात. मुख्यमंत्रीपदाचे वाटप ही संकल्पनाच चुकीची आहे.’’

– शुभांगी भडभडे, ज्येष्ठ लेखिका.

परत सत्तेत येतील

‘‘फडणवीस लढाऊ आहेत. जे कोणाला जमले नाही ते त्यांनी पाच वर्षांत करून दाखवले. ते नागपूरकर आहेत आणि ते पुन्हा परत सत्तेत येतील याचा विश्वास आहे.’’

– विवेक रानडे, प्रसिद्ध छायाचित्रकार.

राजकारणात बदल होतच असतात

‘‘फडणवीस यांनी पाच वर्षे राज्यकारभार केला. त्यांचे काम चांगले होते. राजकारणात बदल होतच असतात तो त्यांनी स्वीकारावा.’’

– रूपाताई कुळकर्णी, ज्येष्ठ समाजसेविका.

स्थिती वेगळ्या वळणावर गेली

‘‘महायुतीला बहुमत असल्याने फडणवीसच पुन्हा सत्तेत येणे अपेक्षित होते. पण सध्या स्थिती वेगळ्या वळणावर गेली आहे. ते नागपूरकर असल्याने त्यांच्याप्रती या शहराला जिव्हाळा आहे. अनेक विकास कामे होणे बाकी आहे, त्यासाठी ते पुन्हा मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे.’’

– विष्णू मनोहर, सुप्रसिद्ध ‘शेफ’.

जनसमर्थन मिळवावे

‘‘फडणवीस यांनी विदर्भ विकासाकडे लक्ष दिले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर याला खिळ बसण्याची शक्यता आहे. त्यांनी पुन्हा विदर्भाचा मुद्दा हाती घेऊन जनसमर्थन मिळवावे व विदर्भात सत्ता स्थापन करावी.’’

– प्रमोद पांडे, अध्यक्ष जनमंच.

विकासाला वेग दिला

‘‘ नागपूर आणि विदर्भाच्या विकासाचा अनुशेष दूर करायचा असेल तर फडणवीस यांच्यासारखाच  मुख्यमंत्री पुन्हा होणे गरजेचे आहे. विकासाच्या थांबलेल्या गतीला त्यांनी त्यांच्या काळात वेग दिला होता.’’

– अ‍ॅड. नितीन तेलगोटे, सचिव, जिल्हा बार असोसिएशन.

उद्योग जगताला त्यांची गरज आहे

‘‘केंद्रात नितीन गडकरी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मागील पाच वर्षांत नागपूर व विदर्भाचा चेहरामोहरा बदलला असला तरी काही कामे अद्यापही शिल्लक आहेत. विदर्भाचा अनुशेष अद्याप संपला नाही. सिंचन प्रकल्प आणि मेट्रोचे काम अपूर्ण आहे. विदर्भातील उद्योग जगताला चालना मिळण्यासाठीही फडणवीस मुख्यमंत्रीपदी राहणे आवश्यक आहे.’’

– देवेंद्र पारेख, अध्यक्ष ‘वेद’.