संगीताची मनापासून साधना केली तर आयुष्यात बरेच मोठे ध्येय गाठता येते. उपराजधानीतील उत्कर्ष धोटेकर या तरुणाने सिद्ध केले. त्याला ‘लपाछपी’ या मराठी चित्रपटाच्या संगीताकरिता त्याला मराठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लहानपणापासून संगीताच्या वेडाने झपाटलेल्या उत्कर्षने वयाच्या सतराव्या वर्षी नागपूर सोडले आणि मुंबईतून त्याने ध्वनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली.आवड आणि जिद्द, मेहनतीच्या बळावर त्याने अल्पावधीतच मराठी मालिका आणि चित्रपट तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले. मराठी मालिकांना पाश्र्व संगीत देण्यापासून त्याने सुरुवात केली. अभिनेता आमीर खान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दंगल’ हा हिंदी चित्रपट त्याच्या संगीत कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. ‘हायवे’ चित्रपटानंतर शाहरुख खान व अनुष्का शर्माच्या ‘हॅरी मेट सेजल’ या चित्रपटातील संगीत संयोजनातही त्याची महत्त्वाची भूमिका होती. मराठी चित्रपटांनाही त्याने तेवढेच महत्त्व दिले. ‘लपाछपी’ या चित्रपटाने त्याला मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. त्याने सिंगापूर, दुबई, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, थायलंड या देशातही कार्यक्रम केले.

हा पुरस्कार आयुष्याला आणखी नवे वळण देणारा आहे. संगीतात आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे. संगीत हेच आपल्यासाठी सर्वस्व असून संगीताची साधना यापुढेही सुरूच राहील.

– उत्कर्ष धोटेकर