महेश बोकडे

लठ्ठपणावर नियंत्रण, सुंदर व आकर्षक शरीर, फिटनेस यासाठी उपराजधानीत हल्ली क्रॉस ट्रेनिंग व्यायामाकडे तरुणाईचा कल  वाढत आहे. सायकलिंग, पोहणे, धावणे, जिम, योगा यापैकी रोज आळीपाळीने एक व्यायाम केला जात आहे. शहरातील विविध मैदाने, उद्यान, जिम, योग्याभ्यासी मंडळात तरुणाईची गर्दी वाढत आहे.

एखाद्या व्यायामास शरीर अनुकूल झाल्यास पुढे तो व्यायाम करायला फार श्रम करावे लागत नाही.  या व्यायामाला दुसऱ्याही व्यायामाची जोड आवश्यक असते. एकच- एक व्यायाम करून उत्साह कमी होतो. त्यामुळे उपराजधानीत क्रॉस ट्रेनिंग व्यायाम करणारे वाढत आहेत.  एक दिवस सायकलिंग, दुसऱ्या दिवशी पोहणे, तिसऱ्या दिवशी धावणे, चौथ्या दिवशी जिम, त्यानंतर योगा करणे असे विविध पद्धतीचे वेगवेगळे व्यायाम रोज आलटून- पालटून केले जातात. या पद्धतीत व्यायामानुसार चालणाऱ्यांनी वजन उचलणे, धावणाऱ्यांनी पोहण्याचे व्यायाम केल्यास ते फायद्याचे मानले जाते. वजन कमी करण्यासाठी काही व्यक्ती वजन घेऊन जलद गतीने चालतात. परंतु ते  तज्ज्ञांना योग्य वाटत नाही. काहींच्या मते’त्यासाठी धावण्याचे अंतर वाढवणे, वेग आणि व्यायामाची वेळ वाढवणे फायद्याचे आहे. वजन घेऊन चालल्याने शारीरिक संतुलन बिघडून  स्नायूंना किंवा सांध्यांना दुखापत होऊ  शकते. त्यावर ताण येऊ  शकतो.  चालण्यासाठी ट्रेडमिलच्या नवनवीन मशिन्स सध्या उपलब्ध आहेत. त्यात चालण्याची गती, वेळ, हृदयाची गती आणि किती ऊर्जा ज्वलन झाले (कॅलरीज बर्निग) याची माहिती मिळते.

व्यायामासाठी महत्त्वाच्या सूचना

व्यायामामुळे शरीरातील पाणी घामावाटे निघून जाते. तहान लागणे हे शरीरातील पाण्याच्या ऱ्हासाचे लक्षण आहे. त्यामुळे मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी पिण्यास हरकत नाही. व्यायाम रिकाम्या पोटीच करावा, असा अलिखित नियम आहे. पण तो शंभर टक्के खरा नाही. शारीरिक श्रम झाल्याने रक्तातील शर्करा कमी होते. त्यामुळे कधी कधी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊन भोवळ येणे, थकवा येणे, मळमळणे अशी लक्षणे उद्भवू शकतात. त्यामुळे हलका आहार घेऊन सुद्धा व्यायाम केला जाऊ शकतात, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

‘‘चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग, योगा असे क्रॉस ट्रेनिंग व्यायाम करताना सावकाश सुरुवात करा. हळूहळू त्याचा वेग वाढवा. व्यायामाने श्वाशोच्छ्वास जोरात व्हावा, पण धाप लागू नये. हे निकष पाळल्यास हृदयाला आणि रक्ताभिसरण संस्थेचा चांगला व्यायाम होतो. सोबतच शरीर सुडौल होते.

– सुनील कापगते, जय अ‍ॅथलॅटिक क्लब, नागपूर.