पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

पोलीस हे समाजासाठीच आहेत. पण, अनेकदा पोलिसांची समाजात नकारात्मक प्रतिमा निर्माण होत असते. परिणामी, सज्जन व्यक्ती पोलिसांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतात. पण, नागपूरकर याला अपवाद आहेत. नागपुरातील जनता पोलिसांप्रती सकारात्मक असून गुन्हा घडल्यानंतर तो उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यापर्यंत पोलिसांना स्वत:हून सहकार्य करतात, असे मत परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी व्यक्त केले.

चिन्मय पंडित यांनी शुक्रवारी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. पंडित म्हणाले, परिमंडळ-२ अंतर्गत सीताबर्डी, धंतोली, अंबाझरी, सदर, गिट्टीखदान आणि मानकापूर पोलीस ठाणे येतात. सीताबर्डी, धंतोली व अंबाझरी या भागात बाजारपेठ आहे. सीताबर्डी परिसरातून ऑटोचालकांकडून महिलांवर शेरेबाजी करण्याच्या अनेक तक्रारी होत्या. काही मुलींचे अपहरण करून बलात्काराचे प्रकारही समोर आले होते. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी ऑटो व रिक्षा चालकांची नियमित बैठक घेण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने साध्या वेशभूषेत पोलीस परिसरात फिरतात. तसेच रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभे करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. परिसरात पोलीस पायी गस्तही घालतात. कुठेही अनुचित प्रकार समोर आल्यानंतर त्यावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात  आले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये उच्चभ्रू वस्त्यांमध्ये स्पा, सलूनच्या नावाखाली देहव्यापाराचे अड्डे सुरू झालेत. याची माहिती मिळाल्यानंतर अनेक हॉटेल व स्पावर कारवाई करून देहव्यापारात गुंतलेल्या महिला व पुरुष दलालांच्या मुसक्याही आवळण्यात आल्या. आता सामाजिक सुरक्षा विभागाकडून चांगली कारवाई होत आहे. झिरो माईल व संविधान चौक हे आंदोलनांचे हॉटस्पॉट आहेत. त्या ठिकाणी येणारे लोक विशिष्ट मागण्यांसाठी येतात. त्यामुळे परिसरात यथोचित बंदोबस्त ठेवून प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने बघावे, यासाठी पोलीस महत्त्वाची भूमिका बजावतात. आंदोलनकर्त्यांचे समाधान झाल्यानंतर ते परत जातात. गेल्या काही वर्षांमध्ये या परिसरात हिंसक आंदोलन झाले नाही व भविष्यात होऊ नये याची खबरदारी घेण्यात येते. पोलिसांबद्दल समाजाची धारणा नकारात्मक आहे. पण, नागपूरकर पोलिसांबद्दल सकारात्मक असून अनेक गुन्ह्य़ांमध्ये स्वत:हून पुढे येऊन आरोपींना पकडण्यासाठी सहकार्य करतात. परिमंडळ-५ चा अतिरिक्त प्रभार सांभाळताना नुकत्याच घडलेल्या बॉबी माकन हत्याकांडानंतर अनेक नागरिकांनी स्वत:हून पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली होती. नागरिकांकडून मिळणाऱ्या माहितीची शहानिशा करणे व कारवाई करणे यात पोलिसांचे कसब आहे, अशी माहिती चिन्मय पंडित यांनी दिली.

गुन्हेगारांवर प्रतिबंधासाठी निरंतर कारवाई

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘क्रॅकडाऊन’  व ‘ऑपरेशन वाईपआऊट’  असे उपक्रम सुरू केले. त्या अंतर्गत पोलीस अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांची नियमित तपासणी आणि निरंतर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. उपराजधानीतील खुनांची नेहमी चर्चा होते. पण, शहरात टोळीयुद्धापेक्षा कौटुंबिक कलहातून होणाऱ्या खुनांचे प्रमाण जवळपास ९५ ते ९७ टक्के आहे. टोळी युद्धातून खून झाल्याच्या घटना क्वचित घडतात. पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याने हे शक्य झाले आहे.

 ‘केअर’च्या माध्यमातून विधिसंघर्ष बालकांचे पुनर्वसन

अजाणतेपणातून लहान वयात गुन्हा घडल्यानंतर अनेकांच्या माथी गुन्हेगार म्हणून शिक्का लागतो. पण, लहान वयातील गुन्ह्य़ासाठी त्याला गुन्हेगार म्हणून दलदलीत ढकलण्यापेक्षा समुपदेशन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडता येऊ शकते, अशी संकल्पना पोलीस आयुक्तांनी मांडली. त्या संकल्पनेतून ‘केअर’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. याद्वारे त्यांना गुन्हेगारी वर्तुळातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यात येत आहे. अशा मुलांसोबत पोलीस अधिकाऱ्यांचे क्रिकेट व फुटबॉल सामने खेळवून त्यांचा आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आता अनेक मुले पोलिसांच्या सतत संपर्कात राहतात व समाजातील वाईट कृत्यांची माहिती देतात.