दत्तक योजनेचा पर्याय; भवितव्यावर प्रश्नचिन्ह
प्रकल्प राबवायला घेतला कोटय़वधी रुपयांचा, पण हाती दमडीही नाही, अशी अवस्था वनविकास महामंडळाची झाली आहे. ज्यांच्यासाठी प्रकल्प उभारल्या जात आहे, ते प्रकल्पात येण्यापूर्वीच त्यांना दत्तक देऊन प्रकल्पाच्या आर्थिक तरतुदीची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत महामंडळ आहे. त्यामुळे आधीच रेंगाळलेल्या या प्रकल्पाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय सुरुवातीपासूनच ग्रहणाच्या गर्ततेत अडकले आणि अजूनही या प्रकल्पाची त्यातून सुटका व्हायला तयार नाही. दीड दशकानंतर वनखात्यातून वनविकास महामंडळाच्या हातात आलेल्या प्रकल्पाची सुरुवात कशीबशी झाली. गोरेवाडय़ाच्या निसर्ग पायवाटेचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. तर प्राणीसंग्रहालयातील बचाव केंद्राचे आणि सफारीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र, दोन्ही आजीमाजी मुख्यमंत्र्यांचे उद्घाटनाचे हात गोरेवाडय़ावरील ग्रहणाची वक्रदृष्टी दूर सारायला तयार नाहीत. या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आर्थिक तरतूद हाच मोठा अडथळा आहे. त्यामुळे आता हा अडथळा दूर सारण्यासाठी केंद्राच्या या योजनेचा आधार वनविकास महामंडळाने घेतला आहे. एक वर्ष किंवा एक महिन्यासाठीसुद्धा प्राणी दत्तक घेता येणार असून आठवडय़ातून एकदा नि:शुल्क भेट, बचाव केंद्रातील दत्तक घेतलेल्या वन्यप्राण्यांच्या पिंजऱ्याला महिन्यातून एकदा भेट, प्रमाणपत्र, दत्तक घेणाऱ्याचे नाव असा योजनेतील तरतुदीनुसार कार्यक्रम असणार आहे. सध्या या बचाव केंद्रात चंद्रपूर वनखात्यातून आणलेले बिबट मुक्कामी आहेत. त्यांच्या देखभालीसाठीच अजूनपर्यंत कर्मचारी नेमलेले नाहीत. त्यामुळे निधीचा कमतरता हे तर त्यामागील कारण नसावे ना, अशीही शंका आता उपस्थित केली जात आहे.

बिबटे अद्यापही ‘अनाथ’च
महाराजबाग प्राणीसंग्रहालयात दत्तक योजना सुरू झाली तेव्हा सुरुवातीला एका अनिवासी भारतीयाने वाघाला दत्तक घेतले. मात्र, वर्षभरानंतर ही मुदत त्याने वाढवली नाही. त्यानंतर टायगर श्रॉफ या अभिनेत्याने वाघ दत्तक घेतला, पण त्यानेही मुदतवाढीवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर नीलगाय, मोर यासारखे प्राणी काही शाळा आणि खासगी संस्थांनी दत्तक घेतले. मात्र, वाघ किंवा बिबटय़ाला दत्तक घेण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. महाराजबागेच्या तुलनेत गोरेवाडा बचाव केंद्रातील वाघ आणि बिबटय़ाला दत्तक घेण्यासाठी दुप्पटीहून अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी सुरुवातीलाच शंका व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात प्रतिसाद का नाही..

प्राणीसंग्रहालयातील प्राणी दत्तक देण्याच्या योजनेला केंद्रानेच मंजुरी दिली. वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धनाविषयी सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी हा उद्देश त्यामागे होता. या योजनेच्या शुभारंभानंतर विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी प्राणीसंग्रहालयातील प्राणी दत्तक घेऊन या योजनेला बळ दिले. यात प्रामुख्याने क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ, महेंद्रसिंग धोनी, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, दिया मिर्झा यांनी वर्षभरासाठी वाघ, जिराफ यासारखे प्राणी दत्तक घेतले. यातील काहींनी वर्षभरानंतर पुन्हा एक वर्षांसाठी मुदतसुद्धा वाढवली. मात्र, वन्यप्राणी दत्तक योजनेला महाराष्ट्रात म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्या तुलनेत उत्तरप्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये या योजनेला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात अलीकडेच दोन-तीन वर्षांपूर्वी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्यानंतर नागपुरातील महाराजबाग प्राणीसंग्रहालयात ही योजना सुरू झाली.