इमॅजिन नेपाळ ट्रेकच्या १४ जणांच्या चमुने सोमवारी सकाळी ८,८४८ मीटर उंच असलेले जगातील सर्वाधिक उंच ‘माउंट एव्हरेस्ट’ सर केले. या मोहिमेत सात गिर्यारोहक व सात शेरपा यांचा समावेश होता. नागपुरचा युवा गिर्यारोहक प्रणव बांडबुचे हा एकमेव भारतीय गिर्यारोहक होता. एव्हरेस्ट शिखर सर करणारा तो पहिला नागपूरकर आहे.

सीएसी ऑलराउंडर या साहसी संस्थेचा सदस्य असलेल्या प्रणव बांडबुचे याने अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्युट ऑफ माउंटेनिअरिंग अ‍ॅन्ड अलाइड स्पोर्ट्स येथून २००९ व २०१० मध्ये गिर्यारोहणाचे प्रशिक्षण पूर्ण केले. तांत्रिकदृष्ट्या अवघड असणारे ढाउलधर क्षेत्रातील हनुमान तिब्बा, माउंट देव तिब्बा, माउंट शितीधर आणि युरोपातील सर्वाधिक उंच शिखर माउंट अल्ब्रुसवरदेखील त्याने भारताचा ध्वज फडकावला आहे. यापूर्वी त्याने एप्रिल २०१६ मध्ये एव्हरेस्टला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्याने दोन वर्षापासून तयारी केली होती. शिखराच्या जवळ पोहोचला असताना ८,५०० मीटरवर त्याचा शेरपा आजारी पडला. त्यामुळे डोळ्यासमोर दिसत असलेले शिखर सोडून परतावे लागले.

अवघ्या ५४ दिवसात त्याचा हा प्रवास आटोपला होता. त्यानंतर निराश न होता पुन्हा २०१७, २०१८ अशी दोन वर्षे त्याने कसून सराव केला आणि २०१९च्या मोहिमेसाठी त्याने पुन्हा नागपूरकर आयरनमॅन डॉ. अमित समर्थ याच्याकडे शारीरिक तंदुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तो या मोहिमेसाठी रवाना झाला आणि त्याठिकाणी लहानमोठी शिखरे सर करत त्याने अनुभवी गिर्यारोहकांच्या मार्गदर्शनात सराव केला. सोमवारी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी त्याने माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवले. या चमूत प्रणव हा एकमेव भारतीय होता. त्याच्यासोबत ग्रीसचे फ्लॅमपौरी ख्रितिना, आर्कोन्टीदो वासिलिकी, चीनचे जिया लिन चांग, लियू याँगझाँग, वँग झ्यु फेंग, -झेंग हूयी वेन, किती पेम्पा शेरपा, दावा तेन-झीन शेरपा, टॅमटींग शेरपा, लक्पा तमंग, दावा ग्यालजे शेरपा, फुर्बा छोतर शेरपा आणि देंडी शेरपा होते. सर्व गिर्यारोहक परतीच्या प्रवासाला लागले असताना प्रणव मात्र माउंट एव्हरेस्टच्या रांगेतले माउंट लोत्से हे जवळजवळ एव्हरेस्टच्याच उंचीचे शिखर सर करुन परत येणार आहे.

अवघ्या तिशीतील प्रणव नागपूरजवळील कुही या गावचा. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रणवला वडील नाहीत. आई, लहान भाऊ आणि मोठी बहीण असे त्याचे कुटुंब आहे. प्रचंड जिद्द आणि स्वप्नांचा पाठलाग करणारा प्रणव स्वभावाने देखील अतिशय नम्र आहे. बीबीए मध्ये त्याने पदवी घेतली असून तो आता एमबीएला आहे. कुटुंबियांसह सीएसी ऑलराउंडरचे संचालक अमोल खंते व आयरनमॅन डॉ. अमीत समर्थ यांनी प्रणवच्या अभिमानास्पद कामगिरीचे कौतुक केले आहे.

प्रणवने आजपर्यंत सर केलेली शिखरे
-माउंट अल्ब्रुस – १८ हजार ५१० फूट उंच
-माउंट देव तिब्बा – ६,००१
-माउंट शीतीधर – ५,२९०