गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या नामकरणाला एकाचाही विरोध नाही

नागपूर : महाविकास आघाडी सरकारमधील  प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने विदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक बाबींचा जराही विचार न करता निर्णय लादायचे आणि विदर्भातील मंत्र्यांनी ते  मुकाट्याने मान्य करायचे, असा प्रकार गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या नामकरणातून दिसून आला आहे. यानिमित्ताने शिवसेनेच्या वसाहतवादासमोर वैदर्भीय मंत्र्यांनी जणू ‘शरणागती’च पत्करल्याची प्रतिक्रिया आता व्यक्त केली जात आहे.

महाविकास आघाडी सरकारने गोरवाडा प्राणिसंग्रहालयाच्या नामकरणाचा निर्णय घेताना वैदर्भीय जनमानसाचा अजिबात विचार केला नाही. मंत्रिमंडळात त्यावर चर्चा झाल्याचे ऐकिवात नाही. विशेष म्हणजे, विदर्भातील प्रमुख राजकीय पक्षांनाही गृहीत धरले गेले.  हे प्राणिसंग्रहालय उभारण्यात शिवसेना किंवा दिवंगत बाळासाहेबांचे कुठलेच योगदान नाही. त्यामुळे नाव ठरवताना स्थानिक नेते किंवा वैदर्भीय सांस्कृतिक, सामाजिक पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या नावाचा विचार होणे अपेक्षित होते.  मात्र तसे न करता शिवसेनेने त्यांची कल्पना अक्षरश:  लादली.  शिवसेने विदर्भाला वसाहतीप्रमाणे वागणूक देऊन आपला निर्णय थोपवला. महाराष्ट्र वन विकास महामंडळाने या प्रकल्पाची उभारणी के ली.  हे महामंडळ वनखात्याच्या अखत्यारित येते. महाविकास आघाडीत हे खाते शिवसेनेकडे असून या पक्षाचे विदर्भातील नेते संजय राठोड  हे या खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी पक्षनिष्ठा सिद्ध करण्यासाठी  उद्यानाला  आपल्या पक्षप्रमुखांचे नाव दिले. पण, सरकारमध्ये सहभागी  काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विदर्भातील मंत्र्यांनी त्याला विरोध के ला नाही. एकानेही  मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर असहमती दर्शवली नाही. शिवसेनेने घेतलेल्या  निर्णयावर  केवळ मान तुकवण्याचे काम मंत्र्यांनी केल्याने त्यांना विदर्भाची संस्कृती, लोककला, बोलीभाषेचा अभिमान नाही का, असा प्रश्न आत विचारला जात आहे. या मंत्र्यांना स्थानिक नेत्यांच्या नावांचा, संस्कृतीचा आग्रह धरता आला असता, असे राजकीय जाणकरांचे मत आहे.

उद्घाटनाला काही दिवस शिल्लक असताना अचानक एक आदेश काढून नामकरण करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  उद्यानाचे ऑनलाईन उद्घाटन करणार होते. पण, बाळासाहेबांचे नाव असल्याने त्यांनी व्यक्तिश: उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला.  या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, आमदार विकास ठाकरे उपस्थित होते. डॉ. राऊत यांनी नामकरणाचे समर्थन केले. प्राणी उद्यानाला दिलेले ठाकरे यांचे नाव समपर्क असल्याचे ते म्हणाले. इतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही शिवसेनेचा हा वसाहतवाद अप्रत्यक्षपणे स्वीकारला, अशी प्रतिक्रिया आता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

‘विदर्भातील लोकप्रतिनिधींना आणि स्थानिक जनतेला  विश्वासात न घेता विदर्भातील प्राणी उद्यानाला दिवंगत बाळासाहेब यांचे नाव देणे हा विदर्भावर अन्याय आहे. विदर्भातील मंत्र्यांनी त्यावर मूक सहमती दर्शवणे वैदर्भीय जनतेशी केलेली प्रतारणा आहे.’’ – राम नेवले. मुख्य संयोजक, विदर्भ राज्य आंदोलन समिती.