गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांच्या आत्म्याला तृप्त करायचे नाही  तर विदर्भात शिवसेनेला घट्ट पाय रोवण्यासाठी मदत करायची आहे.  मात्र, याचा काहीही फायदा शिवसेनेला होणार नाही, अशी टीका ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी के ली.

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्राणिसंग्रहालयातील भारतीय सफारीचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या सात दिवस आधी गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे नामकरण बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान असे करण्यात आले. या नामकरणाला तेव्हापासूनच आदिवासी समाज तसेच विदर्भवादी संघटनांनी विरोध सुरू के ला आहे. अणे यांच्या टीके मुळे हा विरोध आणखी तीव्र झाला आहे. शिवसेनेला विदर्भात राजकीय स्थान नाही. तेच स्थान या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. उपराजधानी ज्या गोंडांनी वसवली, येथे राज्य के ले, त्यांचे नाव गोरेवाडा प्राणी उद्यानाला देणे संयुक्तिक होते. केवळ नाव बदलून लोकांच्या मनात परिवर्तन होणार नाही. नामकरणाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या विदर्भवाद्यांचा आवाज दाबण्यात आला. विदर्भवाद्यांचा आवाज नेहमीच दाबला जातो. हे अपेक्षितच होते, असेही श्रीहरी अणे म्हणाले.