नाना पटोले यांचा आरोप

सरकारी प्रकल्पात जाणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांकडून खरेदी करायच्या व त्यानंतर त्या अधिक दराने सरकारला विकायच्या, असा गोरखधंदा अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मूक संमती असून शेतकऱ्यांना संपण्याचा घाट रचला जात आहे, असा आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी केला.

धुळे जिल्ह्य़ात वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित असल्याचे कळल्यावर पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी तेथील शेतकरी धर्मा पाटील यांची जमीन खरेदी केली. पाटील यांनी जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून बरेच प्रयत्न केले, परंतु त्यांना तो मिळाला नाही आणि त्यांनी कंटाळून आत्महत्या केली. धर्मा पाटील यांच्या समोर विविध अडचणी निर्माण करून आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले आहे. मंत्रालयात बोलावून बैठक रद्द करण्यात आल्याने निराश धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे जबाबदार आहेत. अशाप्रकारे राज्यात कितीतरी धर्मा पाटील असतील. शासकीय प्रकल्पांसाठी संपादित होणाऱ्या जमिनी त्यापूर्वीच खरेदी करायच्या आणि नंतर त्या अधिक दराने विकण्याचा धंदा मंत्री करू लागले आहेत. शेतकऱ्यांना संपण्याचा घाट फडणवीस सरकारचा आहे. समुद्र किनारपट्टी तसेच समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला अशाचप्रकारे अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पोटनिवडणुकीत काँग्रेस

भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार आहे. मात्र, आपण उमेदवार नसू, असे पटोले म्हणाले. ही निवडणूक माझ्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेतील कार्यकाळ अजूनही बराच शिल्लक असल्याने ते लोकसभा निवडणूक लढणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.