News Flash

संघर्षमय प्रवास..

पटोले यांची राजकीय कारकीर्द विद्यार्थिदशेपासून सुरू झाली.

(संग्रहित छायाचित्र)

काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भाच्या भंडारा जिल्ह्य़ातील साकोली मतदारसंघाचे आमदार आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेले पटोले यांचा राजकीय प्रवास संघर्षमय राहिला आहे. ‘छावा’ या युवक संघटनेच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणाला सुरुवात करीत ते जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, विधानसभा अध्यक्ष झाले.

पटोले यांची राजकीय कारकीर्द विद्यार्थिदशेपासून सुरू झाली. साकोली येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ‘एनएसयूआय’मध्ये ते सक्रिय होते. पटोले हे सावडी येथून भंडारा जिल्हा परिषदेत १९९० मध्ये निवडून आले. १९९५ मध्ये त्यांनी लाखांदूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. २००४ च्या निवडणुकीत ते पुन्हा आमदार झाले.

२००९ मध्ये काँग्रेसशी फारकत घेतल्यावर २००९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून साकोली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली व जिंकली. २०१४ च्या लोकसभेत ते भाजपकडून लढले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला.

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ओबीसीच्या मुद्दय़ांवरून ते सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत राहिले. अखेर खासदारकी सोडून काँग्रेसमध्ये परतले. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर लोकसभा लढवली. प्रचाराला कमी कालावधी मिळाला, तरी त्यांनी गडकरी यांचे मताधिक्य कमी  केले. ओबीसी जनगणनेचा प्रस्ताव स्वत विधानसभेत संमत करवून घेतला. तसेच नागपूर विधानभवनातील ग्रंथालय वर्षभर युवकांसाठी खुले केले. नागपुरातील सचिवालयदेखील कायमस्वरूपी सुरू राहील, अशी योजना आखली. एवढेच नव्हे तर ईव्हीएमला पर्याय म्हणून मतपत्रिकेचा वापर करण्यासाठी कायदा करण्याची सूचना सरकारला केली. अशा प्रकारे विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी आपली छाप सोडली आहे.

आक्रमक, रोखठोक!

शेतकरी आणि ओबीसींच्या मुद्दय़ांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध टीकेची झोड उठवल्यानंतर नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. आक्रमक आणि रोखठोक अशी त्यांची प्रतिमा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2021 12:15 am

Web Title: nana patole struggling journey abn 97
Next Stories
1 पर्यावरण मंजुरीसाठी अटींचे पालन करणारी देखरेख यंत्रणा सुधारा
2 ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात ७० हजार कोंबडय़ा नष्ट
3 शासनाच्या निर्देशाशिवाय कारवाई केली तर याद राखा!
Just Now!
X