पक्षांतर्गत गटबाजीवर मात केल्याचे चित्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने नाना पटोले यांना मैदानात उतरवले आहे. पटोले यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते आज शुक्रवारी सकाळी दिल्लीहून रेल्वेने नागपुरात दाखल झाले. यावेळी शहर काँग्रेस, युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतादरम्यान जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर त्यांनी गणेश टेकडी मंदिर, दीक्षाभूमी, कामठी मार्गावरील गुरुद्वारा, ताजाबाद येथे भेट दिली. व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळा, संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. प्रत्येक निवडणूक आव्हानच असते, आव्हानांचा सामना करीत आपण इथपर्यंत पोहोचलो. असे असले तरी  नागपूर लोकसभा निवडणुकीचे फार मोठे आव्हान आपल्याला वाटत नाही, असे मत यावेळी नाना पटोले यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,

नागपुरात काँग्रेसमध्ये गटबाजी नसून विरोधकांनी गटबाजी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे माझ्यासाठी आदरणीय आहेत. ते मला डमी उमेदवार म्हणत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. डमी उमेदवार कोण आहे, हे काही दिवसात स्पष्ट होईल, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कॉंग्रेस कार्यकत्यांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती.

गडकरींच्या आशीर्वादाबद्दल आभार

नितीन गडकरी माझ्यासाठी आदरणीय आहेत. मोठय़ांचा आशीर्वाद नेहमीच लहानांसोबत असतो. गडकरींनी मला दिलेल्या आशीर्वादाबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे पटोले म्हणाले.