भाजपमध्ये आलेले आयाराम समाधानी का नाहीत, असा प्रश्न आता अनेकांना पडू लागला आहे. गेली दोन वर्षे अस्वस्थेत काढणाऱ्या नाना पटोलेंनी ऐन गुजरात निवडणुकीच्या काळात भाजपला रामराम ठोकला. त्यासाठी त्यांनी खासदारकीचा त्याग केला. पटोलेंची आक्रमक भाषा बघून त्यांची समजूत काढण्याच्या भानगडीत भाजपमधील कुणी पडले नाही. त्यांना ज्या नितीन गडकरींनी पक्षात आणले, तेही पटोलेंपासून चार हात दूरच राहिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पटोलेंची समजूत काढू, असे जाहीर विधान एकदा केले पण तेवढय़ावरच ते थांबले. आता भाजपच्या वर्तुळात पक्ष सोडण्याची पटोलेंची सवय जुनीच आहे. ते आजवर हेच करत आले आहेत, अशी चर्चा होत असली तरी एका खासदाराचा एवढय़ा लवकर भ्रमनिरास का झाला, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या भानगडीत पडायला कुणी तयार नाही. आता काटोलचे आमदार आशीष देशमुख पटोलेंच्या मार्गाने निघाले आहेत. त्यांची रोज येणारी वक्तव्ये या शंकेला बळ देणारी आहेत. या देशमुखांचे घराणे पूर्णपणे काँग्रेसचे. त्यांच्या वडिलांनी अख्खी हयात याच पक्षात घालवली. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर रणजीत देशमुखांचे अनेकदा पक्षाशी खटके उडाले. त्यातून त्यांनी पक्षही सोडला, पण दुसऱ्या पक्षात जाण्याचे धाडस त्यांनी केले नाही. त्या तुलनेत त्यांच्या मुलांनी धाडस दाखवत भाजपला जवळ केले. आशीष देशमुख निवडूनही आले. आता मात्र त्यांनी भाजपला जाहीरपणे प्रश्न विचारणे सुरू केले आहे. त्यांचे प्रश्न पक्षाला अडचणीत आणणारे आहेत. त्याची उत्तरे देण्याच्या भानगडीत कुणी पडत नसले तरी या जाहीर वादामुळे पक्षाच्या अंतस्थ वर्तुळात अस्वस्थता मात्र नक्की आहे. इतर पक्षाच्या तुलनेत भाजपमधील शिस्त थोडी कडक आहे. या शिस्तीला संघाच्या कार्यशैलीची पाश्र्वभूमी आहे. त्यामुळे जाहीर वादविवाद, बंडखोरी याची सवय या पक्षाला मोठय़ा प्रमाणात झाली नाही. असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी केलाच किंवा बंडखोरीची भाषा केली की पद्धतशीरपणे त्याला राजकीयदृष्टय़ा संपवले जाते. या पाश्र्वभूमीवर आशीष देशमुखांचे वागणे या पक्षाची गोची करणारे आहे. सत्ता मिळवण्यासाठी भाजपने अनेक उमेदवार बाहेरून आयात केले. ते करताना त्यांच्या राजकीय विचाराची बैठक, राजकीय पाश्र्वभूमीचा अजिबात विचार केला नाही. केवळ निवडून येणे हाच एकमेव निकष ध्यानात घेतला. ही मंडळी पक्षात आल्यावर व निवडून आल्यानंतर त्यांच्यावर पक्षाची शिस्त लादण्याचा प्रयत्न केला. पटोले, देशमुखांची प्रकरणे यातून उद्भवली आहेत. भाजपत आलेल्या प्रत्येकाने संघभूमीला प्रणाम केलाच पाहिजे, असा पक्षाच्या नेत्यांचा आग्रह असतो. या पक्षात नव्याने दाखल झालेल्यांना हा सक्तीचा प्रणाम अनाठायी वाटतो. निवडून आल्यावर पक्षाशी बांधीलकी ठेवणे एकदाचे समजून घेता येईल, पण संघाप्रती निष्ठावान व्हा, हा आदेश कसा काय पाळायचा, हा या पक्षात आलेल्या अनेक नवागतांचा सवाल आहे. अनेकजण हा प्रश्न खासगीत उपस्थित करतात. आशीष देशमुखांनी तो उघडपणे विचारला व चर्चेला तोंड फोडले. संघभूमीला भेट देण्यासाठी न जाणे हा पक्षशिस्तीचा भंग कसा काय होऊ शकतो, हा देशमुखांचा सवाल आहे. भाजपकडून याचे उत्तर कुणी देत नाही, पण देशमुखांना पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीशीचे उत्तर अजून मिळाले नाही, असे आवर्जून सांगितले जाते. शिस्त लादणे आणि अंगी भिनवणे या भिन्न गोष्टी आहेत, याचा विसर या सत्ताधारी पक्षाला सध्या पडला आहे. पक्षाचा विस्तार करण्याचा हक्क भाजपला जरूर आहे, पण तो करताना शिस्तीचे दोरखंड अनेकदा सैल करण्याचा चतुरपणा दाखवावा लागतो. हे या पक्षाच्या लक्षात आलेले दिसत नाही. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संघभूमी प्रात:स्मरणीय व आदरणीय असेल, पण या पक्षात बाहेरून आलेल्यांना तसेच वाटावे, हा आग्रह अनाठायी आहे. या साऱ्या प्रकारामुळे डिवचले गेलेल्या देशमुखांनी आता पक्षाला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणे सुरू केले आहे. स्वतंत्र विदर्भाच्या आश्वासनाचे काय, हा त्यांचा प्रश्न भाजपची अडचण वाढवणारा आहे. जे काम विरोधकांनी करायचे असते ते पक्षाचाच आमदार करू लागल्याने या अडचणीची व्याप्तीही मोठी आहे. भाजपचा विकासाचा तोंडवळा सुद्धा शहरी आहे. मेट्रो, रस्ते, पूल यावरच या पक्षाचा भर असतो. हा पक्ष सामाजिक विकासाच्या संकल्पनांविषयी फारसा बोलत नाही. शहरी व निमशहरी मतदार गृहीत धरून विकासाच्या चकचकीत योजना जाहीर करण्यावर या पक्षनेत्यांचा जोर असतो. समाजातील गरीब, दलित, आदिवासी, शोषित, पीडित यांचा विचार कुणी करायचा, असा प्रश्न म्हणूनच उपस्थित होतो. देशमुखांचे प्रश्न नेमके यावरच बोट ठेवणारे आहेत. भाजप सरकारने जलयुक्त शिवार, पीक कर्जामाफीसारख्या योजना ग्रामीण भागासाठी राबवल्या. मात्र, यातून किती फायदा झाला हा अजूनही संशोधनाचा विषय आहे. शेतकरी वर्गात सरकारबद्दल अजूनही नाराजीची भावना आहे. ही भावना देशमुख बोलून दाखवतात. देशमुखांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाला प्रतिसाद द्यायचा नाही, त्यावर बोलायचे नाही असेच सध्या भाजपचे धोरण दिसते. देशमुखांना काय करायचे ते करू द्या, अशी भूमिका या पक्षाचे नेते खासगीत मांडताना दिसतात. मात्र हे या घडामोडीवरचे अंतिम उत्तर नाही. पक्षात आलेले हे नवे नेते एवढय़ा लवकर का कंटाळले? त्यांचा भ्रमनिरास का झाला? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात भाजपला सध्या रस नाही. याचे एकमेव कारण सत्ता हे आहे. भाजपची विदर्भातील आजवरची वाटचाल बघितली तर संघटना विस्तारासाठी या पक्षाने अनेकदा अनेकांची मदत घेतली. त्यात पक्षाच्या परिघाबाहेरचेच लोक भरपूर होते. या मदतीतून संघटना सशक्त झाल्यावर या बाहेरच्या मंडळींना खडय़ासारखे दूर सारण्यात आले. अनेक जिल्ह्य़ात अशी उदाहरणे आहेत. त्यामुळे पटोले व देशमुख हे भाजपसाठी तरी निमित्तमात्र आहेत. उद्या हे दोघे बाहेर गेले तरी त्यांच्या कार्यक्षेत्रात पक्षाचा फायदा कसा होईल, याची रणनीती आतापासूनच आखली जात असेल यात शंका नाही. या दोघांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापेक्षा त्यांच्या कार्यक्षेत्रात संघटना मजबूत करायची, असाच या पक्षाचा प्रयत्न आहे व तो दोन्ही ठिकाणी दिसत आहे. पटोलेंच्या हे लवकर लक्षात आले व ते तडक बाहेर पडले. आता पाळी देशमुखांची आहे. ते काय करतात हे लवकरच दिसेल, पण या साऱ्या घटनाक्रमात नुकसान या दोघांचे व फायदा भाजपचा हेच चित्र भविष्यात दिसणार आहे.

devendra.gawande@expressindia.com