शहरातील विविध भागात गाईच्या गोठय़ांची संख्या वाढत असल्याने परिसरातील लोकांना त्रास होत आहे. महापालिकेने पशुधन संगोपनाला महत्त्व देऊन ‘नंदग्राम’ ही योजना सुरू करण्याचे जाहीर केले, त्यासाठी आर्थिक तरतूद केली होती. मात्र, त्यासाठी असलेली नियोजित जागा दुसऱ्या प्रकल्पासाठी दिली जाणार असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीला प्रशासनाकडून देण्यात येणार असल्यामुळे हा प्रकल्प केवळ कागदावर राहणार असल्याचे समोर आले आहे.

शहराचा चहुबाजूने विकास होत असतानाच विविध भागात जनावरांचे गोठे निर्माण झाले आहेत त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये त्याचा त्रास वाढला होता. शिवाय विविध वस्त्यामध्ये ठेवण्यात येणारी जनावरे शहरातील विविध भागातील वर्दळीच्या रस्त्यावर दिसून येतात त्यामुळे शहरात अपघाताचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे गोठे हटविण्यासाठी नागरिकांचा आणि काही सदस्यांचा दबाव वाढत होता. गोठे हटविल्यास जनावरे ठेवायची कुठे? हा प्रश्न गोपालकांना पडला. मात्र, तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी तीन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात शहरातील विविध भागातील सर्व पशुधनाच्या संगोपनासाठी वाठोडा परिसरात चांदमारीमध्ये ४८ एकर परिसरात ‘नंदग्राम’ या प्रकल्पाची संकल्पना मांडली.

या नंदग्रामध्ये ५ हजारांवर जनावरांचे संगोपन करण्याची व्यवस्था होऊ शकेल असा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते त्याप्रमाणे तो करण्यात आला होता. अर्थसंकल्पातही भरीव तरतूदही करण्यात आली होती. वाठोडा परिसरात महापालिकेची मोठी जमीन असून, सिव्हरेज फॉर्मसाठी ती राखीव आहे त्यामुळे जनावरांच्या गोठय़ात निर्माण होणाऱ्या घाणीचीही योग्य पद्धतीने विल्हेवाट लावता येणार होती. या योजनेला नगररचना विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर राज्य शासनाकडे तो प्रस्ताव पाठविण्यात आला होता मात्र अजूनही त्या प्रकल्पाला राज्यात भाजपचे सरकार असताना गेल्या दीड वर्षांत ना मान्यता मिळाली ना प्रशासनाकडून त्याचा पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी झाली नाही. सध्या पूर्व नागपुरात वाठोडामध्ये साई हा क्रीडा संकुलाचा प्रकल्प उभारण्यासाठी जागा देण्यात आली असून तो मार्गी लावण्यात आला आहे. त्याच परिसरात चांदमारीमध्ये ‘नंदग्राम’ प्रकल्पाला मात्र विरोध होत आहे. ज्यावेळी चांदमारी जागा निश्चित करण्यात आली होती त्याचवेळी नागरिकांनी विरोध केला होता. या जागेवर अनेक  झोपडपट्टी धारकांनी अतिक्रमण केले असून त्यांची वस्ती आहे. नंदग्राम प्रकल्पाला यादव समाजाने विरोध केल्यावर त्यांनी निवेदन दिले होते. महापालिकेतील सत्तापक्षात असलेल्या  काही सदस्यांनी शहरातील गोठे बाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केले. नंदग्राम प्रकल्प रेंगाळला असताना त्या जागेवर ‘ साई’ क्रीडासंकुल आणि किमान कौशल्य केंद्र सुरू करण्याला सरकारकडून मान्यता मिळाली आहे.

पर्यायी जागेचा शोध

या संदर्भात तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी, नंदग्राम हा प्रकल्प साकारला जाईल त्यासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू असल्याचे सांगितले.