मागील काही दिवसांपासून तापमान 45 अंशाच्या पुढे जाऊन पोहचले आहे. उन्हाचा तडाखा आणि बँकांपुढे होणारी गर्दी पाहता ग्राहकांच्या सोयीच्या दृष्टीने बँकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ग्राहकांसाठी सकाळी 8 ते दुपारी 1 असे नवीन वेळापत्रक 1 जून पासून लागू असणार आहे. याबद्दल जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्याशी चर्चा करून सर्व बँकांना कळविल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बिरेंद्र कुमार यांनी सांगितले

कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि अनेकांना याचा फटका बसला. बँकेतून रक्कम काढणे किंवा निराधार, स्कॉलरशिप अशा वेगवेगळ्या योजनांमध्ये जमा झालेले पैसे, काढण्यासाठी आता बँकांपुढे रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 45 ते 46 अंश तापमानात बँकाबाहेर सोशल डिस्टनसिंग ठेवताना काही ठिकाणी मंडप टाकले असले तरी गर्दीपुढे अपुरे पडत आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाचा तडाखा पाहता ग्राहकांना अडचणी होत असल्याने सकाळी 8 वाजता पासून दुपारी 1 वाजेपर्यंत ग्राहकांना बँकिंगचे व्यवहार करता येणार आहे. यानंतर 1 ते 3 ही वेळ बँकेची अंतर्गत कामकाजासाठी असणार आहे. 1 जूनपासून वेळेत झालेल्या बदलाची नोंद ग्राहकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बँकेचा ग्राहक महत्वाचा असल्याने त्याच्या अडचणी पाहता, बँकेच्या वेळेत बदल केला आहे. वयोवृद्ध व महिलानी वेळेच्या आत जाऊन आपले व्यवहार पूर्ण करून बँकांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बीरेंद्र कुमार यांनी केले आहे.