विधिमंडळाचा अवमान केल्याचा पिता-पुत्रांचा आरोप

विधिमंडळाच्या अवमानाचा अधिकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला कोणी दिला, असा सवाल करीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी विधिमंडळात ‘लोकसत्ता’च्या शनिवारच्या अग्रलेखाबाबत तीव्र  संताप व्यक्त केला. विधिमंडळाने याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली. त्यावर या अग्रलेखाबाबत काय करता येईल यावर विचार करू, असे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत सांगितले, तर हा औचित्याचा मुद्दा होऊ शकत नाही, याबाबत  हक्कभंग दाखल करायचा असल्यास नोटीस दिल्यावर विचार करू, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेच्या हक्कभंग समितीने अमरावतीचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना शिक्षेची शिफारस केली आहे. त्यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अग्रलेखात लोकप्रतिनिधी, नियमांचा दंडक दाखवीत राजकीय दबाव झुगारणारे अधिकारी, विधिमंडळ सदस्यांचा सन्मान याविषयी टीकाटिप्पणी केली आहे. या अग्रलेखाचा मुद्दा नारायण राणे यांनी विधान परिषदेत तर नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला.

सर्व लोकप्रतिनिधींना एकाच पारडय़ात तोलण्यात आले आहे. पत्रकारांकडूनही पत्रकार भवन किंवा अन्य कारणांसाठी निधी मागितला जातो. मग सर्वानाच ‘पाकीटमार’ म्हणायचे का, असा सवाल नितेश राणे यांनी केला. राणे यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह काही सदस्यांनी अनुमोदन दिले.