शरद पवारांवरील कारवाईचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या विरोधात नागपूर शहर आणि जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी अर्धनग्न आंदोलन करून सरकारचा निषेध केला.

शहरात संविधान चौकात शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि काटोल येथे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संविधान चौकात अर्धनग्न आंदोलन करून सरकारचा निषेध केला.  राज्य सरकारने शिखर बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार आणि इतर ७० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीने शरद पवार यांच्यावरील  कारवाई  राजकीय द्वेषातून झाली आहे, असा आरोप केला आहे. ईडीने ज्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखला केला आहे. त्या प्रकरणाशी पवार यांचा काहीही संबंध नाही. पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरात जे दौरे सुरू आहेत. त्याला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. याच धास्तीमुळे फडणवीस सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून ही कारवाई केली आहे. ५० ते ६० वर्षे राजकीय कारकिर्दीत पवार यांच्यावर कधीच भ्रष्टाचाराचा आरोप हा झाला नाही. भाजप सरकारने केवळ राज्यात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई करून त्यांची राजकीय  कारकीर्द मलीन करण्याचा हा प्रयत्न केला आहे. ईडीने त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, असे निवेदन माजी मंत्री अनिल देशमुख यांनी काटोलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले, तर संविधान चौकातील आंदोलनात बोलताना युवक आघाडीचे शहराध्यक्ष तिवारी म्हणाले, भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत युवकांना रोजगार मिळवून देणारे धोरण आखले नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. हे सर्व लपवण्यासाठी सरकार विरोधी नेत्यांवर कारवाई करीत आहे. संविधान चौकातील राष्ट्रवादीच्या आंदोलनात कार्यकारी जावेद हबीब, महिला अध्यक्ष अलका कांबळे, नुतन रेवतकर, वेदप्रकाश आर्य, बजरंग परिहार, बाबा गुजर, वर्षां शामकुळे, अशोक काटले, धनराज फुसे उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी, तौसिफ शेख, प्रणय जांभुळकर, अनिल बोकडे, कमलेश बागडे सहभागी झाले होते.