10 August 2020

News Flash

राष्ट्रीय महामार्ग-७ वन्यप्राण्यांच्या जिवावर!

अनेक बिबटे, अस्वलांचे मृत्यू; चौपदरीकरण वादाच्या भोवऱ्यात अभयारण्य, तसेच व्याघ्र प्रकल्पालगतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीदरम्यान वन्यप्राण्यांसाठी प्रभावी उपाययोजनेअभावी वाहनांखाली येऊन दरवर्षी अनेक वन्यप्राण्यांचे मृत्यू होत आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर २०११ मध्ये बिबटे, हायना आणि अस्वलांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

अनेक बिबटे, अस्वलांचे मृत्यू; चौपदरीकरण वादाच्या भोवऱ्यात
अभयारण्य, तसेच व्याघ्र प्रकल्पालगतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीदरम्यान वन्यप्राण्यांसाठी प्रभावी उपाययोजनेअभावी वाहनांखाली येऊन दरवर्षी अनेक वन्यप्राण्यांचे मृत्यू होत आहेत. गोंदिया जिल्ह्य़ातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांखाली येऊन दरवर्षी किमान २०-२५ वन्यप्राणी मृत्युमुखी पडत आहेत. याच कारणामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे चौपदरीकरण वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
देशात जंगलालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर नेमके भुयारी मार्ग नसल्यामुळे दरवर्षी शेकडो वन्यप्राण्यांचे मृत्यू होत आहेत. भुयारी मार्गाअभावी दोन जंगलाला जोडणारे कॉरिडार धोक्यात आले आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण याच कारणामुळे रखडले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाला लागून हा महामार्ग आहे आणि या महामार्गावरही वन्यप्राण्यांचे बळी जात आहेत. मात्र सर्वाधिक बळी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातने घेतले आहेत. सातत्याने दरवर्षी २०-२५ मोठय़ा वन्यप्राण्यांचा मृत्यू या मार्गावर वाहनांखाली होत आहेत. लहान वन्यप्राण्यांच्या संख्या याहूनही अधिक आहे.

दरवर्षी रस्ते अपघातात २०-२५ वन्यप्राण्यांचा मृत्यू ही वन्यजीव आणि व्याघ्र संरक्षणासाठी चांगली गोष्ट नाही. २०११ पासूनची वन्यप्राण्यांच्या मृत्यूची यादी वाढतच आहे. त्यामुळे या महामार्गावर तातडीने प्रभावी उपाययोजना आखावी.
-किशोर रिठे, राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर २०११ मध्ये बिबटे, हायना आणि अस्वलांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. २०१२ मध्ये दोन बिबटे आणि दोन अस्वलांचा मृत्यू झालेला आहे. २०१३ मध्ये पाच अस्वल या महामार्गाचे बळी ठरले असून २०१५ मध्ये दोन हायना आणि दोन बिबटे वाहनांखाली येऊन मृत्युमुखी पडले आहेत.

* वन्यप्राण्यांच्या भटकंतीचा वेग रात्री अधिक असतो आणि याच वेळी वाहनांचा वेगही अधिक असल्यामुळे वन्यप्राणी या महामार्गाचे बळी ठरत आहेत.
* राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने तातडीने यावर प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी मध्य भारतातील वन्यजीव संरक्षण, संवर्धन आणि आदिवासी विकासावर गेल्या १५ वर्षांपासून काम करणाऱ्या सातपुडा फाऊंडेशनने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2015 5:41 am

Web Title: national highway nh7 become dangerous for animals
टॅग Wildlife
Next Stories
1 ‘विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक मंथन होईल’
2 भुजबळांचा प्रश्न…वाघांचे गुरगुरणे आणि सरकारचे उत्तर!
3 शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चेस विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे एकमत
Just Now!
X