काँग्रेसचा आर्थिक मंदी, बेरोजगारीविरुद्ध एल्गार; फडणवीसांना राष्ट्रवादीची ‘परत या’ची साद

शेतकऱ्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती रस्त्यावर; दिल्ली पोलिसांच्या निषेधार्थ वकिलांची ‘गांधीगिरी’

शहरासाठी बुधवारचा दिवस हा आंदोलन ‘वार’ तर संविधान चौक हे आंदोलनाचे केंद्रस्थान ठरले. आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्येविरोधात काँग्रेसने एल्गार पुकारला, तर फडणवीस पुन्हा नको म्हणून राष्ट्रवादीने आंदोलन केले. परतीच्या पावसामुळे झालेल्या पीकहानीची नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरले. दिल्लीतील घटनेच्या विरोधात वकिलांनीही निदर्शने केली.

याच क्रमात एका अभिनव आंदोलनानेही लक्ष वेधून घेतले. फडणवीस सरकार पुन्हा सत्तारूढ व्हावे म्हणून एका युवकाने संविधान चौकातून टेकडी गणपती मंदिरापर्यंत ‘दंडवत’ घातले.

 काँग्रेसच्या आंदोलनात नेत्यांपेक्षा कार्यकर्ते जास्त

नागपूर शहर व ग्रामीण काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सरकाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून सामान्य जनता त्रस्त असलेल्या महागाईच्या विरोधात आंदोलन केले. शहरात दोन आमदार निवडून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला आणि आंदोलनात नेत्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक लोक गोळा झाले होते.

शहर काँग्रेसने सीताबर्डी पोलिसांना आंदोलनात सुमारे दोनशे लोक येतील, असे सूचना दिली होती. परंतु प्रत्यक्षात ७०० ते ८०० लोक आले. नागपूर शहर काँग्रेस व ग्रामीण काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार ‘‘संविधान चौकात’’ शहर काँग्रेसचे अध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार विकास ठाकरे व ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात वाढलेली महागाई, बँकांची दिवाळखोरी, आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, गुन्हेगारी, जीएसटीमुळे  ठप्प झालेले उद्योग धंदे, आरोग्य शिक्षण आदी समस्यांवर तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी धरणे आदोलनांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांना शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अ.भा.काँग्रेसचे सचिव आशीष दुवा, आमदार सुभाष धोटे उपस्थित होते. शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, सत्ता कोणाचीही असो, सामान्य माणसासोबत लढण्याचे काम आम्ही करू. राजेंद्र मुळक म्हणाले, भाजप सरकारमुळे देश मागे गेला. कामगारांची चूल उद्ध्वस्त झाली. आता आपण जनमानसासाठी  रस्त्यावर येऊन कामे केली पाहिजे.

मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राचे औक्षवण

राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आज संविधान चौकात अभिनव आंदोलन केले. फलकावरील मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला औक्षवण करून ‘तुमची राज्याला गरज नाही, नागपुरात परत या, अशा घोषणा दिल्या.

‘‘मी पुन्हा येईन’’ असे वक्तव्य करणारे मुख्यमंत्री सत्तास्थापनेत अपयशी ठरत असल्याने त्यांची राज्याला गरज उरली नाही. मुख्यमंत्री तुम्ही नागपुरात परत या ‘वेलकम टू नागपूर’ अशा आशयाचे फलक लावून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तुम्ही महाराष्ट्रापेक्षा आपला मतदारसंघ सांभाळा. तुमचे नागपूर नगरीत स्वागत आहे, अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात अलका कांबळे, ईश्वर बाळबुधे, अविनाश गोतमारे, सतीश इटकेलवार, डॉ. विलास मूर्ती, महेंद्र भांगे, मोरेश्वर जाधव, रिजवान अंसारी, रूद्रा धाकडे, जतीन मलकान, अजहर पटेल,  गोपाल ठाकूर, मोरेश्वर फटिंग, नितीन नायडू, प्रणय जांभुळकर, रेखा गौर, डॉ. मीनाक्षी वाडबुधे, पुष्पा डोंगरे, शोभा भगत, चंद्रकला पाटील, मंदा वैरागडे, नेहा गौर, विजया लालझरे सहभागी झाले होते.

 सडक्या भाज्या रस्त्यावर फेकल्या

परतीच्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी करत विदर्भ राज्य आंदोलन समितीने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर सडक्या भाज्या व फळे फेकली. समितीचे मुख्य संयोजक राम नवले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे. कापूस जमिनीवर पडला असून सरकीमधून कोंबे निघाली आहेत. सोयाबीनच्या गंज्या शेतातच सडून दाण्याला अंकुर फुटले आहेत. धान आडवा पडला आहे. संत्री गळाली आहेत. शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत मिळावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. आकाशवाणी चौकात आंदोलनाला परवानगी नाकारल्याने आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. या ठिकाणी सडकी संत्री आणि भाजीपाला रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. रंजना मामुर्डे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी सुनील वडस्कर, मुकेश मासुरकर, विजय मौंदेकर, विष्णू आष्टीकर, वृषभ वानखेडे, विनायक खोरगडे, वसंतराव वैद्य, वसंतराव कांबळे, नीलेश पेले आदी ग्रामीण भागातील शेतकरी उपस्थित होते.

 फडणवीस सरकारसाठी युवकाचे ‘दंडवत’

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची निवड व्हावी, अशी मागणी करत भाजप कार्यकर्ते व मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती विपीन तेलगोटे यांनी संविधान चौक ते टेकडी गणेश मंदिर या मार्गावर दंडवत आंदोलन केले.

फडणवीस फॅन्स क्लबचे सदस्य विपीन तेलगोटे यांनी सकाळी संविधान चौकातून दंडवत घालत आंदोलन सुरू केले.  टेकडी गणेश मंदिर परिसरात गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो, भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यावेळी महाआरती करण्यात आली.

तेलगोटे म्हणाले, सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. तरीही सत्तास्थापनेत भाजपला अडचणी येत आहेत. हे अरिष्ट टळून देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून हे आंदोलन केले.

 वकिलांनी केला लालफित बांधून निषेध

दिल्लीतील तीस हजारी न्यायालय परिसरात दिल्ली पोलिसांनी वकिलांवर बेछूट लाठीमार व गोळीबार केल्याच्या निषेधार्थ बुधवारी शहरातील वकिलांनी जिल्हा न्यायालयातील एक्सिट गेटसमोर गांधीगिरी मार्गाने निदर्शने केली. यावेळी शेकडो वकिलांनी लालफित बांधून निषेध व्यक्त केला.

उत्तर दिल्लीतील तीस हजारी न्यायालय परिसरात काही पोलीस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली.

हे प्रकरण एवढे वाढले की पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. तीस हजारी कोर्टाच्या लॉक अपमध्ये वकिलाला जाण्यास पोलिसांनी रोखल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. यावेळी दिल्लीतील अतिरिक्त पोलीस उपायुक्त हरिंदर सिंग, विशेष पोलीस आयुक्त संजय सिंग यांना निलंबित करा, एएसआय पवन कुमार, एएसआय कांत प्रसाद यांना अटक करा, घटनेचा योग्य पध्दतीने तपास करून दोषींविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा यांच्यासह मोठय़ा संख्येने वकील उपस्थित होते.