News Flash

गोरेवाडा सायकल सफारीला निसर्गप्रेमींचा प्रतिसाद

इंधनविरहीत आणि पर्यावरणपूरक सायकलींकडे अलीकडच्या काळात लोकांचा कल वाढला आहे.

वैद्यकीय व्यवसायातील लोकांपासून तर सर्वच मोठय़ा पदावर असलेली व्यक्तीही आता सायकलप्रेमी झाली आहे.

निसर्गाचा आनंद लुटण्याची पर्यटकांना अमूल्य संधी
इंधनविरहीत आणि पर्यावरणपूरक सायकलींकडे अलीकडच्या काळात लोकांचा कल वाढला आहे. आधुनिकतेच्या युगात गडप झालेल्या सायकलीला आता पुन्हा चांगले दिवस आले आहेत. अनेक शहरांमध्ये सायकलप्रेमींची संख्या वाढत असून वैद्यकीय व्यवसायातील लोकांपासून तर सर्वच मोठय़ा पदावर असलेली व्यक्तीही आता सायकलप्रेमी झाली आहे. नेमका याचाच आधार घेत वनखात्याने आधी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सायकल सफारीला सुरुवात केली. त्यापाठोपाठ वनविकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातसुद्धा काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या सायकल सफारीला आता निसर्गप्रेमींचा प्रतिसाद मिळू लागला आहे.
निसर्गाच्या जवळ जाऊ इच्छिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटनाचा आनंद मिळवण्यासाठी आणि व्याघ्र दर्शनासाठी पर्यकांनी जंगल सफारीचा आनंद मिळवला असला तरीही तेच कारण त्यांना निसर्गाच्या जवळ जाण्यासाठीसुद्धा कारणीभूत ठरले आहे. सुरुवातीला स्वत:च्या वाहनाने प्रवेश दिल्या जाणाऱ्या व्याघ्र प्रकल्पात कालांतराने जिप्सीचा पर्याय जंगल सफारीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आणि त्यालाही लोकांनी पसंतीची पावती दिली. त्यामुळे स्वत:चे वाहन घेऊन गेल्यानंतरही ते उभे ठेवून जिप्सीचा पर्याय निवडणारे पर्यटक अधिक आहेत. पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेल्या ताडोबात काही दिवसांपूर्वी जंगल सफारीसाठी सायकलीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. त्याच धर्तीवर दोन दशकानंतर पूर्णत्वास येऊ घातलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातही सायकल सफारी नुकतीच सुरु करण्यात आली. सायकल सफारी सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवडय़ात सहा सायकल सफारी येथे घडून आल्या. तर दुसऱ्या आठवडय़ात तीन सायकल सफारी घडून आल्या. सायकलीने गोरेवाडा सफारी करणारा हा समूह सायकलपटूंचा असला तरीही नागपूरकरांसाठी सायकलीने निसर्गाचा आनंद लुटण्याची ही अमूल्य संधी आहे. त्यामुळे सायकलपटूंपाठोपाठ सर्वसामान्य नागपूरकरसुद्धा या सायकल सफारीला प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सायकल सफारीचे पॅकेज
सध्या गोरेवाडय़ातील सायकल सफारीसाठी सहा सायकल वनविकास महामंडळाने खरेदी केल्या आहेत. या सर्व सायकल गेअरच्या असून सुमारे साडेअकरा हजारांची एक सायकल आहे. चार तासांच्या सफारीसाठी १२ किलोमीटरचा गोरेवाडय़ाचा परिसर पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. एकावेळी पाचजणांचा एक समूह आणि एक मार्गदर्शक असा सहाजणांचा समूह गोरेवाडय़ात सायकल सफारीसाठी पाठवण्यात येतो. एका सफारीकरिता ६०० रुपये आणि मार्गदर्शकाला २०० रुपये असे एकवेळच्या सायकल सफारीचे पॅकेज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 1:51 am

Web Title: nature lovers response to gorewada cycle safari
Next Stories
1 शिक्षक नसलेल्या महाविद्यालयांचे संलग्निकरण धोक्यात
2 सोनिया गांधींच्या सभेसाठी काँग्रेसचा ‘नियंत्रण कक्ष’
3 विक्रमी महसूल वसुलीमुळेच यंदा नागपूरची उद्दिष्टवाढीपासून सुटका!
Just Now!
X