कोटय़वधीच्या नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. समीर भास्करराव चट्टे (४८) असे आरोपीचे नाव आहे.

समीर चट्टे हा नवोदय बँकेत २००७ ते २०१२ या कालावधीमध्ये मुख्य कार्यकारी पदावर कार्यरत होता. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीमध्ये बँकेचे लेखा परीक्षण करण्यात आले असता २०१० ते २०१५ या कालावधीमध्ये बँकेत ३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला.

या प्रकरणाची तक्रार तत्कालीन लेखा परीक्षक श्रीकांत सुपे यांनी पोलिसांकडे केली होती.  यात बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांच्यासह जवळपास ४० वर आरोपी आहेत. त्यात चट्टे याचाही समावेश आहे. आरोपी हा बँकेचे मुख्य कार्यपालन अधिकारी असताना अध्यक्ष व इतर संचालकांसह मिळून सचिन मित्तल, बालकिशन गांधी यांचे ग्लॅडस्टोन समूह, हिंगल समूह, झाम समूह आणि जोशी समूहाची कर्ज परतफेड करण्याची क्षमता आहे किंवा नाही, हे न तपासताच त्यांना कोटय़वधी रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असताना ३० नोव्हेंबर २००९ ला ७ लाख ५० हजार रुपयांचे स्वत:लाच कर्ज मंजूर करून एक भूखंड खरेदी केला.  त्याच्यावर अटकेची कारवाई पोलीस निरीक्षक प्रशांत माने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक उपनिरीक्षक किशोर चुटे, सुरेश वानखेडे, ज्ञानेश्वर वानखेडे आणि भारती माडे यांनी केली.

अशोक धवड यांना जामीन नाही

या प्रकरणातील मुख्य आरोपी व नवोदय बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.