नवरात्रीचा प्रारंभ झाल्याने तरुणाईचे आवडता रासगरबा आता रंगायला लागला आहे. नागपूरकर तरुणाई यंदा गरब्यात ‘सालसा’वर ठेका धरत असून कपडय़ांमध्ये  बाहुबली आणि काठियावाडा फॅशनची धूम सुरू आहे.

सध्या गरब्याला व्यावसायिक आणि ग्लॅमरस स्वरूप प्राप्त झाले आहे. नवरात्रीच्या आधी गरबा प्रशिक्षण वर्ग घेतले जातात व यात तरुणाईसोबतच गृहिणींची संख्याही दिवसागणिक वाढत आहेत.  महाविद्यालये, महिला मंडळ, राजकीय पक्ष, व्यावसायिक आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी शहरातील विविध भागात गरब्याचे आयोजन केले आहे. काही ठिकाणी  प्रतिदिवस हजार ते पाच हजार रुपये शुल्क आकरण्यात येत आहे.  तरुणाईने बाहुबली आणि काठियावाडी कपडे खास गुजरातमधून बोलावले आहेत. महिलांसाठी घागरा-चुनरी पाच हजार तर पुरुषांसाठी काठियावाडी प्रकारचे कपडे तीन हजारांच्या दरात विकले जात आहेत. छत्तरपूर फार्म येथे होणारा गरबा शहरातील सर्वात श्रीमंत गरबा आहे.

‘सालसा’ काय आहे

सालसा हा कॅरेबिया देशातील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे.  कालांतराने हा नृत्य प्रकार अमेरिकेने आत्मसात केला आणि त्यात काही बदल केले. अमेरिकेत बार, नाईट क्लब, रेस्टॉरेन्ट आणि उत्सवात अल्पकाळातच सालसा प्रसिद्ध झाला आणि पुढे तो भारतात पोहोचला. भारतातही सालसा नृत्याचे विशेष विदेशी प्रशिक्षक आहेत. जोडीने केल्या जाणाऱ्या या नृत्य प्रकारात पायाचा ठेका महत्त्वाचा असतो.

सध्या सालसा नृत्य शिकण्याकडे तरुणाईचा सर्वाधिक कल आहे. प्रशिक्षण वर्गाला तरुणाईसोबतच गृहिणींचाही चांगला प्रतिसाद होता. पंधरा दिवस प्रशिक्षण वर्ग सुरू होते.

– डेनिस पास्कल, नृत्य प्रशिक्षक