|| देवेंद्र गावंडे

१ फेब्रुवारी २००९. उत्तर गडचिरोलीतील ग्यारापत्ती ते सावरगाव मार्गावर पुलाचे बांधकाम करणाऱ्या एका कंत्राटदाराची वाहने नक्षलींनी मरकेगावजवळ जाळली. तेव्हा कुरखेडाचे एसडीपीओ होते श्याम घुगे. त्यांनी ग्यारापत्ती पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचा हुकूम दिला. पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुडधेकर १५ सहकाऱ्यांसह २ तारखेला सकाळी घटनास्थळी पोहोचले व नक्षलींच्या सापळ्यात अलगद अडकले. चकमकीत हे सर्व शहीद झाले. आता दहा वर्षे तीन महिन्यानंतर त्याच भागात तोच प्रकार पुन्हा घडला. तेव्हा गुडधेकर व त्यांचे सहकारी वाहने न वापरता पायी घटनास्थळी गेले होते. जांभुळखेडय़ाला जाताना जवानांनी वाहनाचा वापर केला. कुरखेडाचे आताचे एसडीपीओ शैलेश काळे यांनीच त्यांना वाहनाने येण्यासाठी उद्युक्त केले. दहा वर्षांत घुगे ते काळे अशा प्रवासात अधिकाऱ्यांची नावे तेवढी बदलली. नक्षल्यांचा प्रभाव, त्यांचे डावपेच, रचलेले सापळे व त्यात पोलिसांचे अडकणे तसेच कायम आहे.

दशकानंतरही नक्षलविरोधी मोहीम राबवताना पोलीस यंत्रणा त्याच त्या चुका करत असेल तर त्याला काय म्हणायचे? या काळात गडचिरोलीच्या पोलीस दलात कितीतरी बदल झाले. अनेक नव्या जागा निर्माण झाल्या. खास मोहिमेसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकाचे पद निर्माण झाले. सी ६० वरचा ताण कमी करण्यासाठी क्यूआरटी आली. तरीही जवानांची, अधिकाऱ्यांची चुका करण्याची, गाफील राहण्याची मनोवृत्ती कायम राहिली. कुरखेडय़ावरून निघालेल्या जवानांच्या हालचाली कुणाच्या निर्देशावरून होत होत्या? पोलीस अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक यांना त्याची कल्पना होती की नाही? होती तर त्यांनी वाहने वापरू नका असा सल्ला का दिला नाही? अशा अशांत क्षेत्रात खासगी वाहन वापरणे जास्त धोक्याचे असते. कारण नक्षलींचे खबरी कुठवर पोहचले असतील याचा अंदाज बांधता येत नाही.

या साऱ्या तर्काकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष कसे झाले? मुख्य म्हणजे, घटनास्थळी जाण्याची एवढी काय घाई होती? हे जवान तिथे आग विझवणार होते का? अनेकदा नक्षली आदिवासींचे मुडदे पाडतात तेव्हा हेच पोलीस मृतदेहाच्या पंचनाम्यासाठी दोन दोन दिवस गावात जात नाहीत. कित्येकवेळी गावकऱ्यांनाच मृतदेह घेऊन ठाण्यात बोलावले जाते. दादापूरची जाळपोळ तर निर्जीव वाहनांची होती. तरीही घाई का केली? शैलेश काळे आधी एकटेच कसे समोर निघून गेले? मानक कार्यपद्धतीला फाटा देत वाहन वापरायचेच होते तर सर्व जवानांना एकाच वाहनात बसून या असे सांगण्याचा मूर्खपणा का केला गेला? शोध मोहीम राबवताना जवानांच्या प्रत्येक गटात अंतर असावे, जेणेकरून हल्ला झालाच तर हानी कमी होईल हे साधे तत्त्व कसोशीने पाळले जाते. त्याचा विसर वरिष्ठांना कसा काय पडला? मोहिमेवर निघालेले जवान वाहने सोबत असतील तर काही काळ चालत तर काही काळ वाहनाने असा तुटक प्रवास करतात. चालताना रस्त्याची पाहणी, मध्ये येणाऱ्या पुलांची तपासणी हे सोपस्कार पार पाडतात. या जवानांनी हे करावे असे वरिष्ठांनी का सुचवले नाही?

दादापूरला कोणतीही चकमक सुरू नव्हती किंवा त्यात कुणी फसले नव्हते. हे जवान थोडे उशिरा पोहचले असते तरी फरक पडला नसता. तरीही एवढी घाई का करण्यात आली? अशा अशांत क्षेत्रात एखादी मोठी घटना घडल्यावर परिस्थिती तणावपूर्ण होते. अशावेळी स्थानिक अधिकाऱ्याचा एखादा निर्णय चुकू शकतो हे मान्य. अशा चुका होऊ नये म्हणूनच जवानांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्याची जबाबदारी गडचिरोलीतील वरिष्ठांची असते. प्रत्यक्ष जंगलात असलेल्या अधिकाऱ्याने घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर याच अधिकाऱ्यांची देखरेख असते. निर्णय चुकीचा वाटत असेल तर तो बदलण्याचे अधिकार गडचिरोलीतील अधिकाऱ्यांना असतात. मग घटनेच्या दिवशी हे सर्व वरिष्ठ नेमकी कोणती जबाबदारी निभावत होते?

कार्यक्षेत्रात जवान व अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कर्तव्यच्युतीला त्यांनी वेळीच अटकाव का केला नाही? या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. जवान मेले की प्रत्येकवेळी त्यांनी मानक कार्यपद्धतीचे पालन केले नाही, असे म्हणत सारा दोष मृतांवर ढकलून द्यायचा हा प्रकार वरिष्ठांना  शोभणारा नाही. गडचिरोलीत आजवर जवान शहीद होण्याच्या जेवढय़ा घटना घडल्या, त्यातील एकाही घटनेत वरिष्ठांना दोषी ठरवण्यात आले नाही. प्रत्येकवेळी चुकांची जबाबदारी शहिदांवर अथवा खालच्या अधिकाऱ्यांवर ढकलून देण्यात आली. पोलीस दल ही जर शिस्तबद्ध यंत्रणा असेल तर वरिष्ठ नेहमी निर्दोष कसे ठरू शकतात? हेच जवान नक्षलींना ठार मारतात तेव्हा उत्कृष्ट नेतृत्वामुळेच हे यश मिळाले असे दावे केले जातात. या बळावर वरिष्ठांना पदके मिळतात. म्हणजे यशाची जबाबदारी तेवढी घ्यायची, अपयशाची नाही. हा दुटप्पीपणा किती काळ सहन करायचा?

जांभुळखेडय़ाच्या घटनेमुळे संपूर्ण विदर्भात दु:खाचे वातावरण आहे. त्याला संतापाची किनारही आहे. प्रत्येक शहिदाच्या कुटुंबीयांचा आक्रोश तेच दर्शवणारा आहे. याची दखल राज्यकर्ते घेणार की नाही? गडचिरोलीत काम करणे हे जवान व अधिकाऱ्यांसाठी अतिशय आव्हानात्मक आहे, हे अगदी खरे? पण ही जबाबदारी पेलताना चुका टाळणेही तेवढेच गरजेचे आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला अवैध दारूविक्रीतून मिळणाऱ्या पैशापासून स्वत:ला दूर ठेवा, स्थानिक जनतेचा जास्तीत जास्त विश्वास कसा जिंकता येईल ते बघा, असेही सांगितले जाते. या निर्देशाचे पालन किती जण करतात? कुरखेडा उपविभागाच्या हद्दीत याचे पालन होत होते का? या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून अवैध दारूविक्रीतील वसुलीकडे लक्ष देणारे कोण होते? या मृत्यूकांडाच्या पाश्र्वभूमीवर दलाच्या प्रतिमेला तडे देणाऱ्या या गोष्टींचाही विचार व्हायला हवा. कितीही नुकसान झाले तरी बेहत्तर, पण जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही हे तत्त्व आज गडचिरोलीत किती अधिकारी, जवान पाळतात? या घटनेच्या दोनच दिवस आधी चकमकीत ठार झालेली रामको शरण यायला तयार होती. संपूर्ण पंचक्रोशीला ही गोष्ट ठाऊक होती. या पाश्र्वभूमीवर तिचे ठार होणे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे ठरते. एक वर्षांपूर्वी कसनासूरच्या चकमकीत पोलिसांसोबत गेलेला शरणागत नंदू कसा मारला गेला? अशा घटनांना भलेही प्रसिद्धी न मिळो पण स्थानिक जनतेत त्या पोलिसांची प्रतिमा आपोआप मलीन करत असतात. याच कसनासूरमध्ये बदला घेण्याच्या उद्देशाने नक्षली सहा लोकांचे अपहरण करतात. नंतर तिघांची हत्या करतात व उर्वरित तिघांना सोडून देतात. आणि कायद्याचे प्रतिनिधी असलेले पोलीस संशयास्पद वागतात हे नक्षलविरोधी मोहिमेला खीळ घालणारे नाही का?