News Flash

राष्ट्रवादीच्या नव्या शहराध्यक्षांसमोर १ वरून ११ करण्याचे आव्हान

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुनेश्वर पेठे यांचे ३ जून २०२१ ला नाव निश्चित केले होते

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुनेश्वर पेठे यांचे ३ जून २०२१ ला नाव निश्चित केले

महापालिका निवडणुकीत नेतृत्वाचा कस लागणार

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूर शहराध्यक्षपदी नगरसेवक दुनेश्वर पेठे यांची नियुक्ती केली आहे. नागपूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे एकमेव नगरसेवक पेठे यांच्या नियुक्तीला महत्त्व आहे. पक्षाचे गतवैभव प्राप्त करत महापालिकेतील संख्याबळ एकवरून ११ जागांवर नेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुनेश्वर पेठे यांचे ३ जून २०२१ ला नाव निश्चित केले होते. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज बधवारी करण्यात आली. मावळते शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी ४ जूनला राजीनामा दिला होता. त्यांना पदोन्नती देऊन प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आले. अहिरकर यांच्या कामाच्या शैलीवर पेठे नाराज असल्याचे राष्ट्रवादीच्या वर्तुळात बोलले जात होते.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदी असताना शहरात पक्षवाढीसाठी कधी नव्हे एवढे कार्यक्रम, बैठका घेण्याचा धडका लावला होता. परंतु त्यांचे मंत्रिपद गेल्यानंतर ही मोहीम थंडावली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नागपूर भेटी कमी झाल्या आहेत. या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्नामुळे अपक्ष नगरसेविका आभा पांडे आणि जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार राष्ट्रवादीत आले. याशिवाय अनेक काँग्रेसच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरु होता.  मात्र देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात थोडी सुस्ती आली आहे. शहरात या पक्षाची फारसी ताकद नाही.   राष्ट्रवादीची १९९९ ला स्थापना झाल्यानंतर पहिल्या महापालिका निवडणुकीत म्हणजे २००२ ला ११ जागांवर विजय मिळाला होता.  त्यानंतर हा पक्ष यापेक्षा अधिक जागा जिंकू शकला नाही. त्या उलट २०१७  च्या निवडणुकीत ११ जागांवरून एका जागेवर आला.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पक्षवाढीसाठी हा पक्ष आक्रमक झाल्याचे चित्र होते. आता तर पक्षांतर्गत धुसफूस सुरू असून अनेकजण नाराज आहेत. शहराध्यक्षपदासाठी पेठे यांच्यासह प्रशांत पवार आणि माजी कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांच्या नावाची चर्चा होती. पक्षाने महापालिकेत काम करण्याच्या अनुभव असलेल्या व्यक्तीला संधी दिली आहे.

पाच माजी शहर अध्यक्षांचा पद गेल्यावर रामराम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून नागपुरात शहर अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेल्या आठ नेत्यांपैकी पाच नेत्यांनी पद गेल्यावर पक्षाला रामराम ठोकल्याचा इतिहास आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी दुनेश्वर पेठे यांची पक्षाने नियुक्ती केली.ते पक्षाचे नववे शहर अध्यक्ष आहेत. यापूर्वी हे पद  वसंत पारशिवनीकर, प्रमोद दरणे, दिलीप पनकुले, गिरीश गांधी, अशोक धवड, अजय पाटील, अनिल देशमुख, अनिल अहिरकर यांनी भूषविले   होते. यापैकी पारशिवनीकर, दरणे, गांधी, धवड आणि अजय पाटील या पाच नेत्यांनी वेगवेगळ्या राजकीय कारणांवरून पद गेल्यावर पक्षापासून फारकत घेतली.पारशिवनीकर व प्रमोद दरणे हे दत्ता मेघे समर्थक नेते होते. मेघे यांनी पक्ष सोडल्यावर तेही त्यांच्यासोबत पक्षातून बाहेर पडले होते. गिरीश गांधी यांची शहर अध्यक्ष म्हणून कामगिरी पक्षाची व्याप्ती वाढवण्यास कारणीभूत ठरली होती. कालांतराने त्यांनी शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला . त्यानंतर माजी आमदार अशोक धवड शहर अध्यक्ष झाले. पक्षाने विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने त्यांनीही पक्षत्याग केला. त्यानंतर अजय पाटील शहर अध्यक्ष झाले. पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांना हे पद सोडावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 2:22 am

Web Title: ncp appointed corporator duneshwar pethe as a nagpur city president zws 70
Next Stories
1 घरबसल्या शिकाऊ वाहन परवान्यासाठी ‘आधार’सक्ती
2 पावसाळ्याच्या तोंडावर चेंबरची झाकणे बेपत्ता
3 तिसऱ्या लाटेचा सामना करताना गाफील राहू नका – गडकरी
Just Now!
X