नागपूर : आगामी महापालिका निवडणुका शिवसेनेशी आघाडी करून लढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच जाहीर केले असताना नवनिर्वाचित शहर अध्यक्ष नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनी मात्र शहरातील महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले. पक्ष संघटना वाढविण्यासाठी येत्या काही दिवसात अकरा युथ एक बुथ ही संकल्पना राबवणार आहे. पक्षात कुठलीही गटबाजी चालणार नाही. प्रत्येकाला विश्वासात घेऊन संघटन वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल अहिरकर यांनी राष्ट्र्रवादी काँग्रसच्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नगरसेवक दुनेश्वर पेठे यांची शहर अध्यक्ष म्हणून निवड झाली. यानंतर ते पत्रपरिषदेत बोलत होते. महापालिकेत सध्या पक्षाचे २ नगरसेवक असले तरी शहरात संघटन वाढविण्यासाठी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. पक्षातील जुन्या व नव्या सदस्यांना विश्वासात घेऊन लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल. पक्षात गटबाजी किंवा मतभेद नाही. नाराजांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
प्रदेश पातळीवरील निर्णय होईल. आगामी महापालिका निवडणुकीत पक्ष १५१ उमेदवार उभे करणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात चाचपणी केली जाईल. ५० टक्के महिलांना स्थान देण्यात येईल. राष्ट्रवादी आपल्या द्वारी हा उपक्रम राबवू. कार्यकर्ते घरोघरी जाऊन वार्डातील समस्या जाणून घेतील. बेरोजगारांना काम मिळावे म्हणून विविध प्रभागात रोजगार मेळावे घेण्यात येईल. महापालिकेत सत्ताधारी पक्षाचा व प्रशासनाचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणणार असल्याचे पेठे यांनी सांगितले.