राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात विधानसभेच्या सहा जागा जिंकल्याने पक्ष नेतृत्वाचा विदर्भाबाबत विश्वास उंचावला आहे. त्यामुळे निकाल येताच पक्ष संघटना बांधणीसाठी कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व पश्चिम महाराष्ट्रात आहे. विदर्भातही काही जागांवर ते अस्तित्व टिकवून आहे. अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर या पक्षाला विदर्भात संजीवनी मिळाली आहे. परत एकदा पाचपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. साहजिकच पक्षाचा हुरूप वाढला आहे. निवडणूक निकाल राष्ट्रवादीच्या अपेक्षेपेक्षा चांगला आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भातील नेत्यांनी पक्ष बांधणी करण्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे. पुढील काळात पक्षाची आणखी शक्ती वाढवण्यासाठी विदर्भात पक्ष संघटना बांधणी करणार आहे. विदर्भातील सर्व ११ जिल्ह्य़ात पक्षांची संघटना मजबूत करायची आणि ज्या जागा थोडय़ा फरकाने हरल्या, त्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ च्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्य़ातील काटोल आणि  गडचिरोली जिल्ह्य़ातील अहेरीची जागा परत मिळवली आहे. बुलढाणा जिल्ह्य़ातील सिंदखेडा राजा आणि यवतमाळ जिल्ह्य़ातील पुसद ही जागाही कायम ठेवली आहे. राष्ट्रवादीचा या मतदारसंघांवर कायम प्रभाव राहिला आहे. परंतु २०१४ च्या निवडणुकीत काटोल आणि अहेरीत पराभव पत्करावा लागला होता. याशिवाय राष्ट्रवादीने भंडारा जिल्ह्य़ातील तुमसर आणि गोंदिया जिल्ह्य़ातील अर्जुनी मोरगाव ही जागा जिंकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विदर्भात काही मोजक्या ठिकाणी सभा घेतल्या. मात्र, मिळालेले यश अपेक्षेपेक्षा जास्त आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीच्या विदर्भातील नेत्यांनी नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा जिल्ह्य़ावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे बळ वाढण्याची शक्यता असल्याचे पक्षाला वाटू लागले आहे.

त्यामुळे प्रदेश कार्यकारिणीवर असलेले नागपूर शहरातील पदाधिकारी विदर्भात व नागपुरात पक्ष संघटना बांधणार आहेत. त्यासाठी जिल्हा पातळीवर संघटनात्मक बदल केले जातील. संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यात येतील. त्यांच्याशी संवाद साधतील, असे नवनिर्वाचित आमदार व माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले.

पक्षाने जी पदे आणि जबाबदारी दिली. त्याचा वापर करीत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावे. लोकांच्या समस्या सोडवा, अशी सूचना माजी आमदार दीनानाथ पडोळे आणि प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांना केली.

राष्ट्रवादीचे विदर्भातील शिलेदार

*   अनिल देशमुख-काटोल

(९६,८४२)

*   डॉ. राजेंद्र शिंगणे-

सिंदखेड  राजा (८०,८०८)

*   धर्मरावबाबा आत्राम-

अहेरी (६०,०१३)

*   इंद्रनील नाईक-

पुसद (८९,१४३)

*   राजू कारमोरे-

तुमसर (८७,१९०)

*   मनोहर चंद्रिकापुरे-

अर्जुनी मोरगाव (७२,४००)