News Flash

लोकजागर : पाटलांची ‘व्यर्थ’ पायपीट!

२०१४ मध्ये राज्याची सत्ता गमावल्यानंतर याच जयंतरावांनी सुप्रिया सुळेंना सोबत घेत पूर्ण विदर्भ पिंजून काढला

(संग्रहित छायाचित्र)

देवेंद्र गावंडे devendra.gawande@expressindia.com

खूप अभ्यास करायचा. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायची पण उत्तीर्ण मात्र होता यायचे नाही. विदर्भाचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसची अशी अवस्था झाली आहे. राज्याच्या राजकारणात मधली पाच वर्षे वगळता कायम दबदबा ठेवून असणारा हा पक्ष विदर्भात वाढता वाढत नाही. अगदी जिवापाड कष्ट घेऊन सुद्धा! सध्या जयंत पाटलांचे विदर्भभर फिरणे बघितल्यावर जाणवते ते हेच. या भागात ज्यांना जनाधार आहे, त्या भाजप व काँग्रेसने जेवढी पायपीट केली नसेल तेवढी राष्ट्रवादीकडून होते आहे, तीही सातत्याने. तरीही या पक्षाला विदर्भात म्हणावे तसे यश मिळत नाही. त्यांच्या आमदारांची संख्या दोन आकडी होत नाही. जनाधार वाढवायचा असेल व संघटनात्मक ताकदीला बळ द्यायचे असेल तर मेहनतीसोबतच राजकीय चातुर्य व स्पष्ट धोरणाची साथ हवी असते. नेमका तिथेच हा पक्ष मागे पडतो. याचा अर्थ राष्ट्रवादीकडे चातुर्य व धोरण नाही असे येथे अजिबात म्हणायचे नाही पण विदर्भाच्या बाबतीत या पक्षाचे हे गणित कायम चुकत आले आहे. त्यात सुधारणा करावी असे या पक्षाला वाटत नाही. मग मेहनतीला अर्थ काय?

२०१४ मध्ये राज्याची सत्ता गमावल्यानंतर याच जयंतरावांनी सुप्रिया सुळेंना सोबत घेत पूर्ण विदर्भ पिंजून काढला. तेव्हा त्यांच्या दिंडीला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रत्यक्षात त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षाला अजिबात यश मिळाले नाही. खुद्द शरद पवारांनी स्वत:च्या नेतृत्वाचा राज्यविस्तार करण्यासाठी जळगाव ते नागपूर अशी कापूस दिंडी काढली होती. ते मुख्यमंत्री असेपर्यंत विदर्भात त्यांना चांगला प्रतिसाद मिळायचा. या प्रदेशातील सर्वच्या सर्व खासदार निवडून आणण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावावर असून अद्याप तरी तो अबाधित आहे. मात्र राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून त्यांची विदर्भातील कामगिरी झाकोळत गेली. ती चकाकावी यासाठी पक्षाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण यश मिळाले नाही. असे का होत असेल यावर हा पक्ष कधी विचार करत नसेल का? या अपयशाची अनेक कारणे आहेत. सर्वात पहिले म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे हित सांभाळणारा मराठय़ांचा पक्ष अशी झालेली प्रतिमा. ती पुसावी असा प्रयत्न नेत्यांकडून कधीच प्रभावीपणे झाला नाही. ती निर्माण करण्यात पक्षाची कृती व विरोधकांचा प्रचार या दोन्हीचा वाटा आहे. त्यापैकी कृतीत दुरुस्ती करता येणे सहज शक्य होते पण राष्ट्रवादीने त्याकडे कधी लक्षच दिले नाही. आज ज्यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व आहे त्या जयंत पाटील अथवा अजित पवारांनी विदर्भाच्या हिताची जाहीर व ठोस भूमिका कधी घेतल्याचे स्मरत नाही. वीजप्रकल्प, कोळसा व सिमेंट खाणी जाऊ द्या. या भागात नैसर्गिक साधने आहेत म्हणून या उद्योगांना विदर्भाशिवाय पर्याय नाही पण यापलीकडेही विकासाच्या कल्पना असतात व त्या आपण विदर्भात राबवू अशी ग्वाही या पक्षाने कधीच दिली नाही.

जयंत पाटील दारूबंदीसारख्या मागास मनोवृत्तीच्या आंदोलनावर व्यक्त होत राहिले पण विदर्भातील कृषीसमृद्धी, सिंचन, वस्त्रोद्योग, कृषीवर आधारित उद्योग याचा पाठपुरावा करताना कधी दिसले नाहीत. अजित पवारांनी गोसेखुर्दचा मुद्दा ऐरणीवर आणला पण भ्रष्टाचारामुळे तेच त्यात अडकले. विदर्भात आले की इकडच्या मुद्यांना बोलण्यात प्राधान्य द्यायचे व तिकडे गेले की विसरून जायचे या धोरणामुळे हा पक्ष विश्वासार्हता कमावू शकला नाही. पश्चिम विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्याची नामी संधी या पक्षाला होती व आहे, पण त्यावर कोणताही ठोस कार्यक्रम त्यांनी कधीच समोर आणला नाही. त्यामुळे विदर्भाचा निधी पळवणारा पक्ष अशी विरोधकांनी जनमानसात रुजवलेली प्रतिमा आणखी घट्ट होत गेली. आताही गोसेखुर्दच्या मुद्यावर शेवटी नितीन गडकरींना पुढाकार घ्यावा लागला तेव्हा कुठे जयंत पाटील सक्रिय होताना दिसले. सांगलीच्या पुरात जिवापाड मेहनत करणारा हा नेता वैनगंगेच्या पुराच्या वेळी साधा धावून आला नाही. हा पूर मध्यप्रदेशच्या चुकीमुळे आला हे कळून सुद्धा! खरे तर ही त्यांच्या खात्याची जबाबदारी होती. अजित पवारांनी सत्तेत आल्या आल्या वैदर्भीय विकास निधीत कपात केली. वैधानिक विकास मंडळाची पुनस्र्थापना रोखून धरली. हे सारे लोकांना कळते. लोक लक्षात ठेवतात हे या पक्षाला कळेत नसेल का? स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर सुद्धा राष्ट्रवादीने कायम घूमजाव केले. सध्या ही मागणी थंडबस्त्यात आहे, तिला जनाधार नाही हे मान्य पण या विषयावरची जनमानसातील अनुकूलता अजूनही कायम आहे. त्याचा योग्य राजकीय फायदा इतर पक्ष घेत असताना राष्ट्रवादीने त्याकडे कायम दुर्लक्ष केलेच, उलट हा मुद्दा हेटाळणीचा ठरवला.

विदर्भात ओबीसी, दलित व आदिवासी हे तीन घटक जनाधार वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने अनेकदा केला पण यश मिळाले नाही. कारण एकच, या पक्षाची मराठा अशी झालेली प्रतिमा. त्यातला सर्वात मोठा घटक असलेला ओबीसींचा वर्ग मधल्या काळात भाजपकडे वळला. आता तो पुन्हा काँग्रेसच्या बाजूने झुकू लागला आहे. या स्थित्यंतराने भाजपत अस्वस्थता आहे पण राष्ट्रवादीचे वागणे काही घेणेदेणे नाही याच थाटाचे आहे. विदर्भात मराठय़ांचा प्रभाव फक्त वऱ्हाडातील काही भागात आहे. तेथे अमोल मिटकरींना संधी दिली गेली पण असाच विचार ओबीसींच्या बाबत या पक्षाने केलेला दिसला नाही. दलित व आदिवासी हे घटक बाजूने वळवण्यासाठी पक्षाने जोगेंद्र कवाडे ते प्रकाश गजभिये असे अनेक प्रयोग केले पण त्यात त्यांना यश आले नाही. आदिवासींच्या तर दारापर्यंत सुद्धा हा पक्ष अजून पोहचू शकला नाही. निवडणुकांवर प्रभाव टाकणारे हे तीनही घटक पक्षापासून दूर राहिल्यावर यश तरी कसे मिळेल? मराठा म्हटले की घराणे व त्यापाठोपाठ जहागिरदारी आलीच. राष्ट्रवादीने विदर्भाची सूत्रे नेत्यांच्या हाती देताना हाच प्रयोग येथे केला. त्यामुळे देशमुख, पटेल, नाईक या तीनच घराण्याभोवती या पक्षाचे राजकारण फिरत राहिले. ही तीनही घराणी संघटनात्मक बांधणीसाठी अजिबात ओळखली जात नाहीत. त्यामुळे त्यांना नको असलेले अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेशच करू शकले नाहीत. ज्यांनी पक्षाच्या वरिष्ठांशी थेट संपर्क करून पक्षात प्रवेश घेतला त्यांचे पत्ते या घराण्याकडून बरोबर कापले गेले. पक्षवाढ होत नसल्याचे सर्वात मोठे कारण या घराणेशाहीत सत्तेचे एकवटणे आहे हे राष्ट्रवादीला उमगते पण त्यावर काहीच करता येत नाही एवढा प्रभाव या घराण्यांचा या पक्षावर आहे. आघाडी करून लढण्यामुळे व सरकारावर इतरांचा ताबा असल्यामुळे पक्ष वाढू शकला नाही हे तकलादू कारण झाले. समस्येच्या मुळाशी जाण्याच्या या मुद्यांवर या पक्षाने विचारच केला नाही. त्यामुळे जयंत पाटलांची संवाद यात्रा कागदोपत्री सांधे जुळवणारी ठरेलही, पण यश देणारी असणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 12:15 am

Web Title: ncp focus on vidarbha ncp leader jayant pati visit four districts of vidarbha zws 70
Next Stories
1 स्टारबस चालकाकडून महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न?
2 खोटी माहिती दिल्याचे माहीत असूनही ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार
3 वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१४ व्यक्तींचा बळी
Just Now!
X