बॅटरीवरील वाहनांना प्रोत्साहन; हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारच्या उपाययोजना

मुंबईतील हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांची संख्या नियंत्रित करून एलपीजी, सीएनजी, विद्युतप्रणाली किंवा बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत सांगितले. क्षेपण भूमीतील कचरा विल्हेवाट, सिमेंट, माती वाहतूक आणि कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या धुरासंदर्भात दोषींवर पर्यावरणविषयक नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता प्रदूषण रोखण्यासाठी परिवहन विभागाला पावले टाकावी लागणार आहेत.
मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करणारी स्वयंचलित हवामान केंद्रे सात ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत. अंधेरी, वडाळा, वरळी येथे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरविलेल्या मानकांपेक्षा अधिक धूलिकण आहेत.
क्षेपणभूमीवर कचरा नेला जात असताना व विल्हेवाट होत असताना आजूबाजूच्या परिसरात त्याचे कण उडतात व नागरिकांना त्रास होतो. इमारतींचे बांधकाम सुरू असलेल्या परिसरात सिमेंट व मातीचे कण पसरलेले असतात. त्यांची वाहतूक खुल्या वाहनांमधून होते. वांद्रे येथील एका कंपनीमधून हवेत मोठय़ा प्रमाणावर धूर सोडला जातो, आदी मुद्दे भातखळकर, आशीष शेलार, राज पुरोहित आदींनी उपस्थित केले. त्याबाबत नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्याचे आश्वासन कदम यांनी दिले.

मुंबईत २५ लाखांवर वाहने
मुंबईतील वाहनांची संख्या २०१४ मध्ये २१ लाख ८७ हजार होती. ती २०१५ मध्ये २५ लाख ४६ हजारांवर गेली आहे. वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे कदम यांनी सांगितले.