भीमा-कोरेगाव प्रकरणात पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट तपास केल्याने शहरी माओवादाचा बुरखा फाटला आहे. या कारवाईमुळे देशातील शहरी माओवादाला मोठा धक्का बसला असून माओवाद चळवळीला बऱ्याच प्रमाणात मागे ढकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पण, माओवादी चळवळीची बांधणी अतिशय मजबूत असून त्यांना संधी मिळताच कमी वेळात ते अधिक सक्रिय होतात. त्यामुळे माओवादाचा कायमचा बीमोड करायचा असेल तर नक्षलवाद विरोधी पथक (एएनओ), दहशतवाद विरोधी पथकाशिवायही (एटीएस)  देशभरातील पोलीस दल व इतर सुरक्षा यंत्रणांनी कायमस्वरूपी समन्वय साधून  काम करण्याची गरज आहे, असे मत एएनओचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक आणि शहराचे सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी व्यक्त केले.

रवींद्र कदम यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी माओवादासोबतच नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था या विषयांवर दिलखुलास गप्पा केल्या. भीमा-कोरेगाव प्रकरणी पोलिसांकडे संशयाच्या नजरेतून पाहण्यात येत होते. पण, आजवरच्या तपासात न्यायालयाने पोलिसांचा एकही दावा फेटाळलेला नाही. काहींनी राजकीय दृष्टिकोन ठेवूनच या प्रकरणाकडे बघितले. पण, पोलिसांना राजकारणाशी काहीही देणेघेणे नव्हते. ३ जानेवारी २०१८ ला राज्यात काय झाले, हे सर्वानी बघितले होते.

८ जानेवारी २०१८ ला गुन्हा दाखल झाला व त्याचे दस्तावेज आमच्याकडे तपासाकरिता आले. तपासादरम्यान बरीच धक्कादायक माहिती समोर आली.

भीमा-कोरेगाव येथील घटनेमागे माओवादी चळवळीचा हात असल्याचे काही पुरावे सर्वप्रथम समोर आले. या पुराव्यांचा तपास केला असता ही घटना माओवाद्यांनी अतिशय योजनाबद्ध पद्धतीने घडवून आणली होती. त्यासाठी जवळपास तीन वर्षांपासून त्यांचे प्रयत्न सुरू होते. या कटामागे वरवरा राव, रोना विल्सन आणि अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग  असल्याची माहिती पहिल्यांदा समोर आली. पण, त्यांच्यावर कारवाईपूर्वी पुरावे गोळा करणे आवश्यक होते. त्यासाठी संशयितांच्या घरांची झडती घेतली. यावेळी त्यांच्या घरांमधून संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले. हार्डडिस्क प्रयोगशाळेत पाठवली व त्यांच्या संवादाची प्रक्रिया समजून घेतली. त्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या.  एल्गार परिषद यशस्वी करण्याच्या नावाखाली माओवाद्यांनी ही योजना आखली होती. सुधीर ढवळे, हर्षांली पोतदार, रमेश गायचोर हे एल्गार परिषदेसाठी २०१७ पासून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करीत होते. याकरिता मोठय़ा प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. भीमा कोरेगावचे प्रकरण अधिक पेटवण्यासाठी पुन्हा पैसे देण्याचे दस्तावेज पोलिसांना तपास हाती लागले. पोलिसांकडे आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे असून आजपर्यंत एकाही न्यायालयात पोलीस हरले नाहीत. न्यायालयानेही भीमा कोरेगाव ही घटना मोठा कट असल्याचे मान्य केले आहे. या घटनेत पकडल्या गेलेले आरोपी माओवादी चळवळीतील मोठे म्होरके आहेत. त्यामुळे शहरी नक्षलवाद काही प्रमाणात कमी करण्यात पोलिसांना यश आले आहे, असेही कदम म्हणाले. पण, माओवादाचा बीमोड करण्यासाठी एटीएस, एएनओसह सर्व सुरक्षा यंत्रणांनी समन्वय

साधून कायम जंगली व शहरी नक्षलवादावर काम करण्याची गरज असल्याचे मत रवींद्र कदम यांनी यावेळी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय माओवादाशी समन्वय प्रक्रिया ठप्प

मार्क्‍स-लेनीन आणि माओ (एमएलएम) या विचारसरणीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संघटना आहेत. या सर्व संघटनांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर एका मंचावर येण्याकरिता समन्वय साधण्यात येत असून भाकप-माओवादी ही संघटना मोठा भाऊ म्हणून वागत आहे. वरवरा राव, वर्णन गोल्सालवीस, अरुण परेरा, सुधीर ढवळे आणि इतर शहरी माओवादी आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधण्याचे काम करायचे. त्यांच्यावर कारवाई झाल्याने ही समन्वय प्रक्रिया बंद पडली आहे.

तिसरे दोषारोपपत्र लवकरच

या प्रकरणात आतापर्यंत दोन दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. तिसरे दोषारोपपत्र लवकरच न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात असून लवकरच तपास पूर्ण करण्यात येईल. आता चळवळीचे म्होरके दिल्ली, कोलकाता, भोपाळ, रायपूर, नागपूर, मुंबई आणि पुणे अशा शहरांमधून बुद्धिजीवी माओवादी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहरातील लोकांना याबाबतचे धोके पटवून देत नाही, तोपर्यंत लोकचळवळ उभी राहणार नाही. सशस्त्र क्रांतीशिवाय लोकशाही सरकार उधळून लावता येत नाही, ही त्यांची मानसिकता आहे. त्यातूनच शहरी व जंगली माओवाद हे एकमेकांना पुरक ठरत आहेत.

कायदा व सुव्यवस्था चोख

गेल्या काही महिन्यांमध्ये निवडणूक, दिवाळी, अयोध्या निकाल, ईद-ए-मिलाद, गुरुनानक जयंती आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे शहरात आयोजन झाले. अयोध्या प्रकरणामुळे देशभरात बंदोबस्त असल्याने बाहेरून मनुष्यबळ मिळणार नव्हता. अशा परिस्थितीत उपलब्ध मनुष्यबळात पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्त लावण्यात आला. प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे कुठेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. यासाठी नागपूकरांनाही पोलिसांकडून आवाहन करण्यात आले होते. नागपूरकरांनी पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. गुन्हेगारीचे प्रमाणही कमी झाले आहे, असेही कदम यांनी सांगितले.