‘कोविड संवाद’मध्ये तज्ज्ञांचा सल्ला

नागपूर : करोनापाठोपाठ इतर आजारांचा शिरकाव होत आहे. याला करोनामधून बरे झालेले रुग्ण जास्त प्रमाणात बळी पडत आहेत. त्यामुळे या संकटाला थोपवून लावण्यासाठी अधिक सजग राहण्याची गरज आहे. करोनातून बरे झालेल्यांनी मुखपट्टी लावणे बंधनकारक आहे. घराबाहेर वा जिथे गर्दीच्या ठिकाणी किमान काही महिने जाणे टाळावे. या प्रत्येकाने सुरक्षेची सर्व काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

महापालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएनशच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सोमवारी व्हॅस्कूलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. अतुल रेवतकर आणि कन्सल्टंट रेडिओलॉजीस्ट डॉ. वर्षा सारडा यांचे  ‘कोविडनंतरची गुंतागुंत फायब्रोसिस व थ्रोम्बोसिस निदान व उपचार’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन शंकांचे निराकरण करण्यात आले.

करोनामध्ये रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागल्यानंतर त्यामध्ये त्याच्यावर अनेक औषधांनी उपचार केले जातात. जीव वाचवण्यासाठी अनेक औषधांचे ‘हेवी डोज’ सुद्धा द्यावे लागतात. त्याचा प्रभाव प्रतिकारशक्तीवर पडतो. परिणामी रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याला कमजोरी जाणवते. अशावेळी रुग्णाला फायब्रोसिस व थ्रोम्बोसिसचा धोका संभावतो. फायब्रोसिस म्हणजे फुफ्फुसामध्ये होणारे बदल व त्यातून पुढे संभावणारा धोका. ते टाळण्यासाठी त्याचे योग्य निदान होणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णाचे एचआरसीटी स्कॅन करणे आवश्यक ठरते. करोनाच्या या परिस्थितीमध्ये बहुतांश लोक एचआरसीटी स्कॅन काढत आहेत. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते काढले जावे. एचआरसीटी स्कॅनमुळे रुग्णाच्या संसर्गाचे प्रमाण लक्षात येते. रुग्ण बरा झाल्यानंतर एचआरसीटी स्कॅन केल्यास त्याला होऊ शकणारा संभाव्य धोका लक्षात येतो व तसे उपचार करता येतात.

करोनामधून बरे झाल्यानंतर अनेक रुग्ण डॉक्टरांनी दिलेले औषध बंद करतात. ही धोकादायक बाब आहे. कोणत्याही रुग्णाने स्वत:च्या मनाने औषधे बंद करू नये. बरे झाल्यानंतर सकस आहार, हलका व्यायाम सुरू ठेवावा, असा सल्ला डॉ.वर्षा सारडा यांनी यावेळी दिला.

रक्तात गाठीचा धोका !

फायब्रोसिसप्रमाणेच थ्रोम्बोसिसला अनेक रुग्ण बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. थ्रोम्बोसिस  म्हणजे रक्तात गाठ झाल्याने उद्भवणारा धोका. करोनाचा व्हायरस फुफ्फुसावर तसेच रक्तवाहिन्यांमध्ये आघात करतो. शरीरातील ज्या रक्तवाहिन्यांवर आघात झाला त्याचे परिणाम दिसून येतात. डोक्यातील रक्तवाहिनीमध्ये गाठ निर्माण झाल्यास अर्धांगवायूचा धोका असतो. छातीत झाल्यास हृदयविकार व असे वेगवेगळ्या अवयवांबाबत विविध धोके संभवतात. थ्रोम्बोसिसचे निदान होण्यासाठी सुद्धा एचआरसीटी स्कॅन महत्त्वाचे ठरते. रक्तवाहिन्यांमध्ये गाठ होणे हे करोनापूर्वी पण होतेच. मात्र करोनामध्ये त्याची तीव्रता जास्त दिसून येते. त्यामुळे करोना नंतर किंवा करोनामध्ये कुठल्याही सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला घ्यावा. कोविडमधून बरे झाल्यानंतरही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे सुरू ठेवा. सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीद्वारे उपचार करू नका, असा सल्ला डॉ.अतुल रेवतकर यांनी दिला.