राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी नागपुरातील ३० केंद्रांवर पार पडली. परीक्षा संपेपर्यंत विद्यार्थी आणि परीक्षा केंद्र प्रमुख एका सुप्त दडपणाखाली वावरत होते.

रविवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत ३० केंद्रांवर ‘नीट’ पार पडली. जास्तीत जास्त सीबीएसई शाळांची परीक्षा केंद्र म्हणून निवड करण्यात आली होती तर विद्यापीठाशी संलग्नित डॉ. आंबेडकर महाविद्यालय आणि इतर निवडक महाविद्यालये परीक्षा केंद्र म्हणून निश्चित करण्यात आली होती. जॉमेट्री बॉक्स, पेन्सिल बॉक्स, स्कॅनर, इलेक्ट्रॉनिक पेन, मोबाईल फोन, ब्लू टुथ, गॉगल्स, खाद्यपदार्थ, पाण्याची बाटली, पट्टा, टोपी, जोडे, स्केल, कॅलक्युलेटर, पेन ड्राईव्ह, खोडरबर, हेल्थ बँड, एटीएम व क्रेडिट कार्डसह कॅमेरा आणण्यास बंदी घालण्यात आली होती. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे देखील केंद्र नीटसाठी देण्यात आले नव्हते. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्य़ांचे विद्यार्थी एक दिवस दिवशीपासून नागपुरात दाखल झाले होते. कारण सकाळी ७.३० पासून ते ९.३०पर्यंत विद्यार्थ्यांना केंद्रावर उपस्थित राहण्याचे आदेश होते. तसेच १० वाजल्यानंतर परीक्षा केंद्राचे मुख्य द्वार बंद करण्यात आले होते.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने भारतभर एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट आयोजित केली होती. भारतीय वैद्यक परिषद आणि भारतीय दंत परिषदेची मान्यता असलेल्या महाविद्यालयांमध्ये नीटमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. मात्र, एम्स आणि पाँडेचेरीचे जेयपीएमईआरमध्ये नीटद्वारे प्रवेश केले जात नाहीत.

विद्यार्थ्यांची मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने चौकशी करूनच त्यांना परीक्षा केंद्रात घेण्यात आले. कडक वातावरणात परीक्षा पार पडली. आम्हालाही परीक्षेचे टेंशन होते आणि दिलेल्या नियमांप्रमाणे परीक्षा घ्यायची होती. डॉ. आंबेडकर महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर ९०० विद्यार्थी होते. त्यापैकी ८६५ उपस्थित होते. ३० केंद्रावर नीट पर पडली.

-डॉ. फाले, ‘नीट’ परीक्षा प्रमुख, डॉ. आंबेडकर कॉलेज