निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांमध्ये तर्कवितर्क

‘युद्धसामग्री साठा करण्याचे देशातील सर्वात मोठे भांडार असलेल्या पुलगाव भांडाराची अग्निशमन तसेच सुरक्षा व्यवस्था अत्यंत अव्वल दर्जाची आहे, येथे घडलेली आगीची घटना हा निष्काळळजीपणातून झालेला प्रकार आहे; यामुळे देशाच्या सुरक्षेसाठी लागणाऱ्या साहित्याची मोठी हानी झाली आहे, असे मत सेवेत असताना या भांडाराला भेट दिलेल्या काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. आग कशामुळे लागली असावी, याबाबत लष्करातील निवृत्त अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर सर्वानीच तेथील अग्निशमन व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला.

पुलगाव दारुगोळा भांडारात आग प्रतिबंधक यंत्रणा अतिशय सक्षम आहे. या भांडाराला मी एकदा भेट दिली आहे. अग्निशमनाच्या जवळपास ८० टक्के गोष्टी स्वयंचलित आहेत. दारुगोळा ठेवण्याच्या खोलीत वीजयंत्रणा नाही. तेथे रात्री जाण्यासाठी बॅटरी घेऊन जावे लागते. त्या खोलीची वातानुकूलित क्षमता ५० ते ५५ अंश सेल्सिअस असल्याचे सांगण्यात येते. शिवाय प्रशिक्षित जवान येथे तैनात असतात. हा परिसर म्हणजे संपूर्णत: ‘नो फायर झोन’ आहे. असे असूनही येथे भीषण लागली, याचे आश्चर्य वाटते. यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे, याचे दुख आहे.

– कर्नल आनंद देशपांडे (निवृत्त).

या भांडारात बंदुकीच्या गोळ्यांपासून क्षेपणास्त्रांपर्यंत सर्वच प्रकारचा दारुगोळा ठेवण्यात येतो. त्याला ‘वॉर वेस्टेज रिझव्‍‌र्ह’ असे म्हणतात. आगीची १० ते १२ कारणे असू शकतात. त्यात इमारत जुनी होणे, परिसरातील जंगलात आग लावणे किंवा घातपात आदी शक्यता असू शकतात. परंत,ु देशाच्या सुरक्षितेत महत्त्वाचा ऐवज अशाप्रकारे जळून जाणे दुदैवी आहे. सुरक्षितेबाबत शिथिलता आल्याने अशा घटना घडत असतात. यापूर्वी भरतपूर येथे आग लागली होती. ही आग १५-१६ दिवस भडकत होती. यापूर्वी अनंतनाग आणि कोलकाता येथे मोठय़ा आगी लागल्या होत्या. आगीच्या घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना होणे आवश्यक आहे.

-कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

दारुगोळा हाताळण्याचे काम दिवसा केले जाते. रात्री होत नाही. येथील सुरक्षा व्यवस्था लष्कराच्या हाती आहे. येथे कुणी बाहेरून येऊन स्फोट घडवून आणू शकत नाही. पाच हजार एकरातील परिसरात जंगल आणि गवत आहे. पेटती बिडी, सिगरेट टाकल्याने ही आग लागू शकते. दारुगोळा ठेवलेल्या खोलीचे तापमान वाढले, कालबाह्य़ झालेला दारुगोळा वेळीच हटवण्यात न आल्याने देखील अशी घटना घडण्याची शक्यता असते. हा सारा प्रकार येथील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणातून झाला आहे.

लेफ्ट. कर्नल गुरुदेवसिंग जॉली (निवृत्त)

दारुगोळा भांडारात प्रचंड सुरक्षा व्यवस्था असते. प्रतिबंधात्मक उपाययोजना मोठय़ा प्रमाणात असतात. अशा प्रकारची घटना घडण्याची शक्यता फारच कमी असते, परंतु घटना घडली आहे. त्यामुळे निश्चित काहीतरी उणिवा राहून गेल्या असतील. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होत असून, त्यात सत्य पुढे येईल.

– ग्रुप कॅप्टन सुनील सहाय (निवृत्त)