स्थलांतरित पक्ष्यांच्या हिवाळ्यातील आगमनादरम्यान पक्षी अभ्यासकांना दरवर्षी कोणता ना कोणता नवा पक्षी दिसतो. मोठय़ा संख्येने एकत्र येणाऱ्या पक्ष्यांचा थवा लगेच दिसून येतो, पण आकाराने लहान स्थलांतरित पक्षी सहज दिसून येत नाही. माळराने आणि विरळ जंगलात आढळणारा ‘अंधारी बाज’ पक्षी अमरावती जिल्ह्य़ातील पोहराच्या जंगलात दिसून आला. हिवाळी पाहुणा असलेला हा पक्षी सहजासहजी दिसत नाही. दिशा फाऊंडेशनचे पक्षी अभ्यासक क्रांती रोकडे आणि वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी या पक्ष्याची नोंद केली.
कबुतराच्या आकाराचा हा पक्षी असून शेपटीसह संपूर्ण अंगावर पट्टे असतात. पोटाखालचा भाग काळसर असून दिसायला तो बहिरी ससाण्यासारखा दिसतो. इंग्रजीत याला युरेशियन हॉबी म्हणतात, तर याचे शास्त्रीय नाव फाल्को सुब्बुटेओ लिनॅअस आहे. याची उडण्याची दिशा एकाच मार्गाने असून विदर्भात याचे दर्शन दुर्मीळ मानले जाते. स्थानिक पक्ष्यांना ‘अंधारी बाज’चे दर्शन चकित करणारे आहे. या पक्ष्याला धुती शिखरा किंवा चिरंतक या नावानेही ओळखले जाते. लहान पक्षी, वटवाघूळ, नाकतोडे व इतर कीटक हे त्याचे खाद्य आहे. त्याचा आकार २९ ते ३६ सें.मी.पर्यंत असून पंखांचा विस्तार ७४ ते ८४ सें.मी. इतका असतो. वजन अंदाजे १७५ ते २८५ ग्रॅम असते. या प्रजातीबद्दलचे पहिले वर्णन शास्त्रज्ञ लिनॅअस यांनी १७५८ साली केले. ‘अंधारी बाज’ युरोप, आफ्रिका, आशियातून स्थलांतर करून विदर्भात आल्याचे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी सांगितले. हा पक्षी माळराने व विरळ जंगलात आढळत असून पोहऱ्याच्या जंगलातील सावंगा तलाव येथे याचे दर्शन दुर्मीळ आहे. या ऋतुमध्ये दिशा फाऊंडेशनच्या पक्षीमित्रांनी अनेक दुर्मीळ पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहेत. त्याच्या दर्शनाने मनोज बिंड, वैभव दलाल, राहुल गुप्ता, धनंजय भांबूरकर, प्रफुल्ल पाटील गावंडे, सुरेश खांडेकर, कृष्णा खान, अमित ओगले, सचिन सरोदे, सचिन थोते, शशी ठवळी व निसर्गलेखक प्र.सु. हिरुरकर यांनी या दोन अभ्यासकांचे अभिनंदन केले आहे.

‘पक्षीशास्त्राच्या दृष्टीने नोंद महत्वाची’
पोहरा-मालखेड परिसरात ‘अंधारी बाज’ पक्ष्याची नोंद पक्षीशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. विदर्भात यंदा अनेक दुर्मीळ पक्ष्यांनी हजेरी लावली असून पोहरा-मालखेड जंगल परिसराच्या समृद्ध जैवविविधतेचे हे प्रतीक आहे. या परिसरातील भूस्थित परिसंस्था व जलीय परिसंस्थांचे संवर्धन होणे गरजेचे वाटते. -यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक

‘अंधारी बाज’चे दर्शन आनंददायी’

पोहरा-मालखेड जंगल परिसरात ‘अंधारी बाज’ पक्ष्याचे दर्शन मनाला आनंद देणारे आहे. हिवाळ्यात आपल्या परिसरात अनेक देशीविदेशी पक्षी स्थलांतर करून येतात. आम्ही त्याच्या नियमित नोंदी घेत आहोत.
-क्रांती रोकडे, पक्षी अभ्यासक