महेश बोकडे

दूरदर्शन संच एका शहरातून दुसऱ्या ठिकाणी हलवायचा असला की अनेक जण एसटी महामंडळाच्या बसला प्राधान्य देतात. आपल्याच आसनावर शेजारी टीव्ही ठेवून खुशाल गंतव्य गाठतात. यादरम्यान एखाद्या प्रवाशाने जागा मागितली तर टीव्हीकडे बोट दाखवतात. यातून अनेकदा बस वाहक आणि प्रवाशांचे वादही रंगले आहेत. या वादावर परिवहन महामंडाळाने नवीन शक्कल शोधून काढली आहे. आता प्रवासी आसनावर टीव्ही

ठेवल्यास प्रवासी भाडय़ानुसार तर सामानाच्या रॅकमध्ये ठेवल्यास टीव्हीच्या वजनाइतके भाडे आकारले जाणार आहे. त्याबाबत ७ नोव्हेंबरला परिपत्रक काढण्यात आले आहे.

यापुढे एसटी प्रवासादरम्यान कुणी टीव्ही संच इतरत्र नेत असल्यास ते कुठे ठेवले त्यानुसार हे भाडे आकारले जाणार आहे. हे टी.व्ही. संच प्रवासी आसनावर ठेवल्यास त्याची जागा व्यापलेल्या एक वा दोन आसनावरील प्रवाशांच्या संख्येनुसार  मालभाडे आकारले जाणार आहे. टीव्ही बसमधील रॅकमध्ये ठेवल्यास त्याच्या जुन्या व प्रचलित असलेल्या वजनानुसार भाडे आकारणी केली जाणार आहे. याबाबत एसटी महामंडळाच्या राज्यातील सर्व विभाग नियंत्रणांना सूचना देण्यात आल्या असून पुढे हे वाद होऊ नये म्हणून काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

राज्यात १७ हजार बसेस

राज्यात एसटी महामंडळाच्या सुमारे १७ हजार बसेस प्रवासी वाहतुकीसाठी रोज धावतात. त्यात रोज सुमारे ७० लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी १ लाख २ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची नियुक्ती एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे. प्रवासी सुविधेसाठी राज्यात २५८ बस आगार असून ५७८ हून अधिक बसस्थानकांची सोय आहे.