२३ चित्रपटगृहांची संख्या १२ पर्यंत रोडावली; वाढत्या तोटय़ामुळे बंद पडण्याच्या मार्गावर

ज्या काळात दूरदर्शन, मोबाईल, संगणकासारखे आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते त्या काळात चित्रपटगृह हे एकमेव मनोरंजनाचे साधन होते मात्र, गेल्या पाच-सहा वषार्ंत शहरात मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांची संख्या वाढल्यामुळे शहरातील विविध भागात असलेल्या चित्रपटगृहाची अवस्था मात्र फारच गंभीर झाली आहे. पूर्वी शहरात २३ चित्रपटगृहे होती ती संख्या आता १२ वर आली असून, त्यातीलही काही वाढत्या तोटय़मुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ज्या चित्रपटगृहातून मराठी आणि हिंदी चित्रपटाला राजाश्रय मिळत होता तो गेल्या काही वर्षांत कमी झाला आहे.

गेल्या पाच वर्षांंत मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले असले तरी उपराजधानीतील चित्रपट गृहांची अवस्था मात्र चांगली नसल्याचे समोर आले आहे. शहरातील कुठल्याही भागात गेले तरी किमान एक चित्रपटगृह असायचे त्यामुळे लोकांना मनोरंजनाचे साधन होते. नागपुरात असलेली अनेक सिंगल स्क्रीन असलेल्या चित्रपटगृहाचे रुपांतर मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये करण्यात आले असून त्या ठिकाणी मोठेमोठे मॉल्स उभे झाले आहेत.

नागपुरात सध्या पंचशील, स्मृती, लिबर्टी, सुदामा, जयश्री, जानकी, लक्ष्मी, राजविलास, आशीर्वाद, रिजंट, विजय आणि कृष्णा ही बारा जुनी चित्रपटगृहे सध्या अस्तित्वात आहेत तर नटराज, नरसिंग, चित्रा, आनंद, श्याम यासह अनेक चित्रपटगृहे बंद पडली आहेत. सीताबर्डी भागात व्हरायटी टॉकीज होते त्या ठिकाणी आता इटर्निटी मॉल उभा राहिला. त्या ठिकाणी मल्टीपेक्स चित्रगृह निर्माण झाले आहे. नागपुरात मल्टीपेक्स चित्रपटगृहे पाच आहेत आणि त्या ठिकाणच्या अत्याधुनिक सोयी सुविधांमुळे चित्रपट रसिक आकर्षित झाला असल्याने साहजिकच सिंगल स्क्रीन असलेल्या चित्रपटगृहाकडे फारसे कोणीच फिरकतच नाही. महाल परिसरात नटराज, नरसिंग, शाम आणि राजविलास ही सिंगल स्क्रीन असलेली चित्रपटगृहे होती मात्र त्यातील केवळ राजविलास सध्या सुरू असून उरलेली तीनही बंद झाली आहेत.

मुंबई, पुणे आणि कोल्हापूरबरोबरच नागपुरातील चित्रपटगृहांना असलेला मोठा इतिहास काळाच्या पडद्याआड जातो की काय अशी चिंता वाटू लागली आहे. सिंगल स्क्रीन असलेल्या चित्रपटगृहात पूर्वी मोठमोठय़ा रांगा लागत असत. लोकांना प्रवेश मिळत नव्हता. मात्र आज परिस्थिती उलट झाली आहे. मल्टीप्लेक्सचा तिकिट दर महाग असूनही प्रेक्षकांचा वाढता कल त्याकडे आहे. मात्र सिंगल स्क्रीन असलेल्या चित्रपटगृहाकडे तिकिटदर कमी असूनही त्याकडे फारसे कोणी फिरकत नाही. पंचशील, स्मृती, लिबर्टी या बोटावर मोजण्याइतक्या सिंगल स्क्रीन असलेल्या चित्रपटगृहांमध्ये अत्याधुनिक साधनांचा उपयोग केल्यामुळे या चित्रपटगृहांकडे बऱ्यापैकी प्रेक्षकवर्ग खेचला जात असला तरी अन्य चित्रपटगृहात मात्र खुच्र्या, स्क्रीन, पिण्याची पाण्याची व्यवस्था आदी सुविधांचा अभाव असल्यामुळे चित्रपट रसिक त्याकडे फिरकतही नाही.

चित्रपटगृहे लोकाश्रयाअभावी बंद पडतील

या संदर्भात पंचशील चित्रपटगृहाचे रोहित जयस्वाल म्हणाले, शहरातील सिंगल स्क्रिनची चित्रपटगृहाची जी अवस्था झाली आहे त्याला शहरातील मल्टीप्लेक्स चित्रपटगृहे कारणीभूत आहे. मॉल्समध्ये असलेल्या मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात अत्याधुनिक साधनांचा उपयोग करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी रोज १५ ते २० शो दाखवले जातात. शिवाय शहरातील अनेक सिंगल स्क्रीन चित्रपटगृहात आज चित्रपट रसिकांना ज्या सुविधा देणे अपेक्षित आहे त्या दिल्या जात नाही. त्यामुळे रसिक हा मल्टिप्लेक्स चित्रपटागृहाकडे वळतो आहे. हे प्रमाण वाढत राहिले तर एकेकाळी मोठा राजाश्रय मिळवणारी शहरातील ही चित्रपटगृहे लोकाश्रयाअभावी बंद पडतील. वितरक मल्टीपेक्स चित्रपटगृहांना जास्त प्राधान्य देतात.