चार वॉर्डाचा प्रभाग  *  माहिती शासनाकडे सादर
पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. राज्य शासनाने या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत बदल केला असून पूर्वीचा दोन वॉर्डाच्या प्रभागाऐवजी चार वॉर्डाचा एक प्रभाग केल्याने निवडणुकीची समीकरणेच बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने लोकसंख्येनुसार प्रभागाची विभागणी केली असून त्याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे.
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरपालिकांसाठी दोन वॉर्डाचा तर महापालिकांसाठी चार वॉर्डाचा एक प्रभाग करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. अद्याप अधिकृतरित्या त्याची घोषणा झाली नसली तरी वरील निर्णयानुसारच प्रभाग रचना होणार असल्याचे सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे.
महापालिकेचे सध्या एकूण ७२ प्रभाग आहेत. दोन सदस्यीय ७१ तर तीन सदस्यीय एक प्रभाग आहे. दोन सदस्यीय प्रभागात एक महिला व एक पुरुष असे प्रमाण आहे. नव्या रचनेत चार वार्ड मिळून एक प्रभाग करण्यात आल्यास साधारणत: ३६ प्रभाग होणार असून त्यात प्रत्येकी दोन महिला व दोन पुरुष असे प्रमाण राहील. प्रत्येक प्रभाग हा अंदाजे ६७ ते ६८ हजार लोकसंख्येचा असण्याची शक्यता आहे. चार वार्ड एकत्र करून ही प्रभाग रचना अंमलात आणली जाणार आहे. उत्तर नागपूरपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून दक्षिण-पश्चिममध्ये त्याचा शेवट होणार आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार सदस्य संख्या तेवढीच राहणार असून प्रभाग मात्र ३६ होतील.
महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग रचना लागू करण्यात आली होती. यावेळी प्रभागातील वॉर्डाची संख्या दुप्पट करण्यात आली. अलीकडच्या काळात महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या हुडकेश्वर नरसाळाचा समावेश वर्धा मार्गावरील एका प्रभागात होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास हा प्रभाग पाच सदस्यांचा होईल.

मतदार वाढले
२०११ च्या जनगणनेनुसार शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली असून सरासरी चार लाख मतदार वाढले आहेत. गेल्या निवडणुकीत २० लाख ५२ हजार ६६ लाख मतदार होते, आता ही संख्या २४ लाख ४७ हजारांवर गेली आहे. गेल्यावेळी प्रत्येक वॉर्डाची लोकसंख्या १७ ते १८ हजार होती. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रभाग रचना केली जाईल. १९९२ मध्ये ९८ वॉर्ड होते. १९९७ व २००२ मध्ये ही संख्या १२९ वर गेली. त्यात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्यामुळे गेल्या निवडणुकीत १४५ पैकी ७३ महिला सदस्यांचा समावेश होता. तो यावेळी सुद्धा राहणार आहे. प्रभागातील वॉर्डाची संख्या दुप्पट केल्यामुळे विद्यमान नगरसेवक व इच्छुकांचा रक्तदाब वाढला आहे. प्रभागाची व्याप्ती वाढल्यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या दृष्टीने ही बाब सोयीची ठरली असली तरी छोटे पक्ष आणि अपक्षांच्या आघाडय़ांसाठी ही बाब दमछाक करणारी ठरणार आहे. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवरील भाजपचा ध्वज कायम राहावा म्हणून सरकारने प्रभागाची व्याप्ती वाढवली असली तरी त्यांनाही ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी नाही, अशी चर्चा आहे.

नव्या रचनेनुसार
एकूण प्रभाग – ३६
चार सदस्यीय प्रभाग – ३५
पाच सदस्यीय प्रभाग – ०१
एकूण नगरसेवक – १४५
प्रभागाची लोकसंख्या – ६७ ते ६८ हजार

महापालिकेची सद्यस्थिती
एकूण प्रभाग – ७२
दोन सदस्यीय प्रभाग – ७१
तीन सदस्यीय प्रभाग – ०१
एकूण नगरसेवक – १४५