डीजे पार्टी,  संगीत मैफिलींचे आयोजन; १२ हजार प्रतिजोडपे तर तीन हजार रुपये प्रतिव्यक्ती प्रवेश दर

मावळत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागपुरातील हॉटेल्स सज्ज झाले आहेत. अनेक हॉटेलांमध्ये विशेष संगीत रजनी तर कुठे विशेष डीजेच्या तालावर ठेका धरण्यासाठी डान्स फ्लोअर तयार करण्यात आले आहेत. शहरानजीकचे ढाबे, क्लब, पब आणि रिसॉर्टही ग्राहकांसाठी विशेष तयारी करीत आहेत. पण नववर्षांच्या जल्लोषात चिंब भिजण्यासाठी  खिसा रिकामा करावा लागणार आहे.

शहरात सुमारे दोनशेच्या वर परमिट रुमस् असलेले हॉटेल्स आहेत, जेथे नववर्षांच्या स्वागतासाठी विशेष जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तरुणाईमध्ये नववर्षांच्या जल्लोषासाठी विविध पर्यायांची शोध मोहीम आठवडाभरापासून सुरू आहे. हॉटेलमध्ये मोठा खर्च करण्यापेक्षा सर्व मित्रमंडळी मिळून फार्म हाऊस किंवा रिसॉर्टमध्ये पार्टीचे बेत आखले जात आहेत, तर काहींनी कुटुंबासोबतच पार्टीचा बेत आखला आहे. नागपुरात दरवर्षी छोटय़ा-मोठय़ा हॉटेलांमध्ये मोठय़ा उत्साहात नववर्षांचे स्वागत करण्यात येते. वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी एका जोडप्याला तब्बल १२ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये शाही भोजनासह अमर्यादित मद्याचा आनंद घेता येणार आहे.

मुंबईहून विशेष डीजे एजी सिंग आणि डीजे नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ ते मध्यरात्री १.३० वाजतापर्यंत ही पार्टी चालणार आहे. रामदासपेठ येथील तुली इंम्पेरिअल हॉटेलमध्ये रुफ टॉप पार्टीसाठी पाच हजार रुपये प्रतिजोडपे मोजावे लागतील, तर बॅनक्वेट हॉलमध्ये ४ हजार पाचशे रुपये मोजावे लागणार आहे. एका व्यक्तीसाठी दोन हजार रुपये द्यावे लागेल. तर रात्री उशिरा मद्यसेवन केल्यावर हॉटेलमध्ये थांबण्यासाठी विशेष पॅकेज असून त्यासाठी ७ हजार पाचशे रुपये मोजावे लागणार आहे.

ली- मेरिडियन हॉटेलमध्ये केवळ रेस्टॉरेंटमध्ये परिवारासाठी गाला डिनरची सोय करण्यात आली आहे. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे नववर्षांच्या स्वागतासाठी विविध पॅकेज तयार केले आहे. ऑल नाईट अँन्टरटेंन्मेंटमध्ये डीजे मिला रशिया येथून येणार आहे.

येथे प्रति जोडप्यासाठी आठ हजार रुपये मोजावे लागणार आहे, तर आठ जणांसाठी ४४ हजार, १२ जणांसाठी ६६ हजार, १६ जणांसाठी ८८ हजार रुपयांचे विशेष पॅकेज तयार करण्यात आले असून यामध्ये मद्य व जेवण असणार आहे. शिवाय शहरातील छोटय़ा-मोठय़ा हॉटेलांमध्येही ३१डिसेंबरच्या पार्टीसाठी विशेष आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल्स आणि ढाबे, पबमध्ये रोषणाई करण्यात आली असून विशेष शेफला बोलावण्यात आले आहे.