‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर उड्डाणपुलाखाली पोलिसांचा खडा पहारा; अवैध वसुली करणारे गुंडही पळाले

नागपूर : सीताबर्डी परिसरातील उड्डाणपुलाखाली वाहन उभे करण्यासाठी गुंडांकडून अवैध वसुली केली जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’त प्रकाशित होताच खळबळून जागे झालेल्या सीताबर्डी पोलिसांनी तेथील असामाजिक तत्त्वांना पळवून लावले. तसेच या परिसरात नि:शुल्क वाहनतळाचे फलक नव्याने लावण्यात आले.

सीताबर्डीत वाहनतळाची प्रचंड समस्या आहे. याची गैरफायदा घेऊन उड्डाणपुलाच्या खाली  तकीया धंतोली परिसरातील समीर नावाच्या गुंडाने स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून वाहनतळासाठी पैसे आकारण्याचा गोरखधंदा सुरू केला. लोकसत्ताने मंगळवारी याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांनी घेतली. त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर  मंगळवारी सकाळी तेथे पोलीस कर्मचारी तैनात करून असामाजिक तत्त्वांना पळवून लावले. तसेच या परिसरात नि:शुल्क वाहनतळाचे फलकही लागले. आधीचे फलक गुंडांनी उखडून फेकले होते. ते फलक मंगळवारी पुन्हा लावण्यात आले.

 

पुन्हा गोरखधंदा सुरू होणार नाही ना?

वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कारवाई झाली. पण, संबंधित गुंड पुन्हा या ठिकाणी अवैधपणे वसुली करू नये, याकरिता पोलीस प्रशासनाने काळजी घेण्याची गरज आहे. सीताबर्डी उड्डाणपुलाखाली नि:शुल्क वाहनतळ असून तेथे कोणीही  पैसे मागत असल्याची त्यांनी त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलिसांनी कारवाई न केल्यास लोकसत्ताकडे तक्रार करावी.

उड्डाणपुलाखाली कोणीही अवैधपणे वसुली करीत असल्यास नागरिकांनी त्याची तक्रार पोलिसांकडे करावी. अशा गुंडांना पोलीस अभय देणार नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

– जग्वेंद्रसिंग राजपूत,  पोलीस निरीक्षक, सीताबर्डी.