नागपूरच्या विकासाबाबत गडकरींचे विधान

गेल्या साडेचार वर्षांत शहरात ७२ हजार कोटींची विकास कामे करण्यात आली. ही चित्रपटाच्या आधी दाखवली जाणारी ‘न्यूजरिल’ आहे. चित्रपट अजून बाकी आहे. नागपूर शहर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे शहर होणार आहे. हे सर्व नागपूरकरांनी दाखवलेल्या विश्वासामुळे करू शकलो, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर-नागभीड गेज कन्व्‍‌र्हशन परियोजनेसह महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास, मेट्रो, सार्वजानिक बांधकाम विभागाशी संबंधित २३ विकास कामांचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. फुटाळा  तलाव परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, प्रा. अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, समीर मेघे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, मेट्रोचे संचालक ब्रिजेश मिश्रा, नागपूर महानगर विकास प्राधिकरणच्या सभापती शीतल उगले, एनएचएआयचे आर.के. पांडे, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, अजनी रेल्वे स्टेशन जगातील एक सुंदर रेल्वे स्टेशन होणार आहे. नागपुरात आंतरराष्ट्रीय विमानतळाची टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अजनी येथे जवळपास ४० रेल्वेगाडय़ांच्या हबची निर्मिती केली जाणार आहे. गुलजार, ए.आर. रहमान, तमिळ अभिनेत्री रेवती, अल्फास रॉय यांच्याकडून कारंज्याचे संगीत तयार केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, शहरात अजनी मल्टी मॉडेल रेल्वे स्टेशन, इंटर मॉडल रेल्वे स्टेशन, रस्ते, उद्याने, फुटाळा तलाव, गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. आता नागपूरला टायगर कॅपिटलसोबत पर्यटनाची राजधानी बनवणार आहे. यावेळी आमदार कृष्णा खोपडे आणि ब्रिजेश मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला. संचालन रेणुका देशकर यांनी केले.

विदर्भवाद्यांच्या घोषणा, गडकरी संतापले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणादरम्यान विदर्भवाद्यांनी घोषणा देत पत्रके सभास्थळी फेकली. प्रेस बॉक्सच्या मागे बसलेल्या काही युवकांनी  पत्रके हवेत भिरकावली. त्यात २०१४ मध्ये गडकरी यांनी  स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी दिलेल्या आश्वासनाचा उल्लेख होता. पोलिसांनी घोषणा देणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले. या घोषणांमुळे गडकरी संतापले. शांत बसत नसतील तर त्यांना ठोकून काढा, असे निर्देश गडकरींनी दिले.