भारतासह संपूर्ण जग सध्या करोनासह आणखी एका संकटाशी लढत असून ती म्हणजे विविध माध्यमांत येणाऱ्या खोटय़ा बातम्या. समाजमाध्यमातून अशा शेकडो खोटय़ा बातम्या पसरतात. समाजमाध्यमांवरील बातम्यांवर विश्वास ठेवल्याने अनेकांची फसगत होते. या पार्श्वभूमीवर मुद्रित माध्यमेच सर्वात विश्वासनीय माध्यम आहे, असा निष्कर्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाच्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

जनसंवाद विभागाच्या ६८ विद्यार्थ्यांनी विविध वयोगट आणि व्यवसायाशी संबंधित असलेल्यांचे २८ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान ऑनलाइन सर्वेक्षण केले. कठीण प्रसंगी नागरिक माहिती कुठून आणि कशी मिळवतात, प्रसारमाध्यमांबाबत त्यांचे काय मत आहे, असे आणि अन्य प्रश्न महिला, पुरुष, सरकारी कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक व इतर नागरिकांना विचारण्यात आले होते. या सर्वेक्षणात एकूण १ हजार २०५ नागरिक सहभागी झाले. यात ६५.६ टक्के पुरुष व ३८ टक्के महिला होत्या. विभागाचे प्रमुख डॉ. मोईज हक यांच्या नेतृत्वात हे सर्वेक्षण झाले. ५० ते ८० टक्के सहभागींनी समाजमाध्यमांवर त्यांना मिळालेली माहिती चुकीची आणि निराधार असल्याचे मत व्यक्त केले.

सर्वेक्षणाद्वारे वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्र, रेडिओ, समाजमाध्यमे आणि डिजिटल मीडिया या पाच माध्यमांबाबत माहिती घेण्यात आली. त्यात एकतृतीयांशापेक्षा अधिक नागरिकांनी करोना संक्रमणापूर्वी वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांकडून माहिती घेतली, असे सांगितले. मात्र, गेल्या एक महिन्यात माहितीसाठी वृत्तवाहिन्यांचा वापर आठ टक्क्यांवर वाढला आहे. दुसरीकडे प्रथम क्रमांकावर असलेल्या वर्तमानपत्रांचा स्रोत म्हणून होत असलेला वापर नंतरच्या काळात ११ टक्क्यांनी घसरला. या काळात वर्तमानपत्रांचे प्रकाशन बंद होते. या काळात डिजिटल माध्यमांचा वापर ५.८ टक्क्यांनी वाढल्याचेही दिसून आले.

समाजमाध्यमांवर कमी विश्वास

सर्वेक्षणाच्या माध्यमातून विश्वसनीयता, उपयोगिता आणि जबाबदारी अशा तीन निकषांवर कौल जाणून घेतला. यात सर्वाधिक वाचकांनी वर्तमानपत्रावर सर्वाधिक विश्वास दाखवला. खोटय़ा व भ्रमित करणाऱ्या बातम्या, माहिती याबाबत विचारणा केली असता ३९.०१ टक्के नागरिकांनी समाजमाध्यमांवरील माहिती ५० ते ८० टक्के अविश्वसनीय असल्याचे सांगितले. ही माहिती खरी की खोटी हे कसे कळले? असे विचारले असता ३६ टक्के लोकांनी सरकारने केलेले खुलासे तर ५१ टक्के लोकांनी सत्य शोधन संकेतस्थळांच्या माध्यमातून पडताळणी केल्याचे सांगितले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य माहिती कुठे व कशी आणि कुठल्या माध्यमातून मिळते याचे सर्वेक्षण करण्यात आले. कुठल्याही माहितीच्या स्त्रोतांवर जनतेला शंका असेल तर कठीण काळात करोनाच्या संक्रमणाला रोखणे अवघड होऊ शकते.

– डॉ. मोईज हक, विभाग प्रमुख जनसंवाद विभाग