आगळ्या वेगळ्या आंदोलनाने लक्ष वेधले; आतातरी प्रशासनाला जाग येणार का?

नागपूर : उपराजधानीतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून ते बुजवण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होत नाही. त्यामुळे सामान्य नागपूरकर  त्रस्त झाले आहेत. त्याची दखल घेत जनमंच या स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी रस्त्यावरील खड्डे बुजवून महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि मेट्रोच्या डोळ्यात अंजन घातले. आतातरी प्रशासनाला जाग येईल व ते रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे.

शहरात सध्या मेट्रो, सिमेंट रस्ते आणि उड्डाणपुलांचे बांधकाम सुरू आहे. यासाठी  कंत्राटदारांनी ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. काम संपल्यानंतरही खड्डे व्यवस्थित बुजवण्यात आले नाहीत. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो आहे. यासंदर्भात अनेकदा महापालिका, नासुप्र आणि मेट्रोकडे तक्रारी करण्यात आल्या. खड्डय़ांमुळे अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यानंतरही प्रशासनाकडून खड्डे बुजवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली गेली नाही.

शेवटी खड्डेमुक्त रस्ते हा सामान्य नागरिकांचा अधिकार असून त्यासाठी जनमंच या स्वयंसेवी संस्थेने सोमवारी आगळेवेगळे आंदोलन केले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सिमेंट मिक्सर घेऊन शहरातील विविध भागातील रस्त्यांवरचे खड्डे बुजवले. या आंदोलनामुळे महापालिका, नासुप्र, मेट्रोचे अधिकारी जागे होतील व आपापल्या क्षेत्रातील खड्डे बुजवतील, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जनमंचच्या या आंदोलनात अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्यक्ष राजीव जगताप, महासचिव नरेश क्षीरसागर, कोषाध्यक्ष प्रल्हाद खरसणे, राम आखरे, श्रीकांत दोड, श्रीकांत देवळे, विनोद बोरकुटे, श्रीधर उगळे, बाबा राठोड, प्रकाश गौरकर, उत्तम सुळके , सुहास खांडेकर, प्रदीप निनावे आणि आशुतोष दाभोळकर आदी सहभागी होते.

या भागातील खड्डे बुजवले

जनमंचने सोमवारी सकाळी ९ वाजता इंदोरा चौकातून खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर दहा क्रमांक पूल, कमाल चौक, कडबी चौक, पागलखाना चौक या मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले. मोक्षधाम, लकडगंज परिसरातील असे एकूण १० ठिकाणचे खड्डे बुजवले. खड्डे बुजवत असताना  वाहतूक पोलिसांनी वाहतूक सांभाळण्यात मदत केली, अशी प्रतिक्रिया राजीव जगताप यांनी व्यक्त केली.

महापालिका झोपेत

रस्त्यांवर खड्डे असून लोकांना मन:स्ताप होतो. एक स्वयंसेवी संस्था खड्डे बुजवण्यासाठी पुढे सरसावली असून सकाळपासून खड्डे बुजवण्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागापर्यंतही ही माहिती  पोहचली असावी. पण, गाढ झोपेतील  महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी साधा जनमंचच्या पदाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी करून काम थांबवा, आम्ही करतो, असे बोलायची तसदीही घेतली नाही. यावरून महापालिका प्रशासनाला जनतेच्या प्रश्नांची किती जाणीव आहे, हे समजून येते.

वाहतूक पोलिसांकडून पाठपुरावा

रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे अनेक अपघात झाले. काहींचा मृत्यू झाला. याचे खापर वाहतूक पोलिसांवर फोडण्यात येते. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून वारंवार महापालिकेला रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सांगण्यात येते. पण, महापालिकेकडून पोलिसांच्या विनंतीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.