पर्यावरणप्रेम फक्त अनंत चतुर्दशीपुरतेच का?

महापालिकेने १ सप्टेंबरला शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत घेतलेल्या बैठकीत प्रत्येकाला विसर्जनाचे ठिकाण नेमून दिले होते. मात्र, फुटाळ्यावरील वायुसेनेकडील भाग वगळता इतर १७ ठिकाणी एकाही स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांची उपस्थिती दिसत नाही. त्यामुळे हे पर्यावरणप्रेम फक्त अनंत चतुर्दशीच्या दिवशीपुरतेच का, असा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत.

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे तलाव परिसरात छोटय़ा गणेश मूर्तीसाठी रबराचे आणि मोठय़ांसाठी जमीन खोदून व तार्पोलिन टाकून कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहेत. नागरिकांनी या कृत्रिम तलावातच विसर्जन करावे म्हणून महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाते. त्यासाठी गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांना विसर्जनाची स्थळे नेमून दिली जातात. यावर्षी देखील एक सप्टेंबरला महापालिकेने स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यात सुमारे ११ संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सार्वजनिकपेक्षा घरगुती गणेशाची संख्या अधिक असल्याने विसर्जन हे दुसऱ्या दिवशीपासूनच सुरू होते. त्यामुळे या प्रतिनिधींनी दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांना नेमून दिलेल्या स्थळी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या आठ दिवसात फुटाळ्यावरील वायुसेनेकडील भाग वगळता इतर १६ ठिकाणांवर कुणीही दिसले नाही. या वायुसेनेकडील भागाची जबाबदारी ग्रीन विजिल या संस्थेला दिली होती. या संस्थेने आतापर्यंत तब्बल १५०० मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात घडवून आणले आणि सात ट्रक निर्माल्य गोळा केले. या परिसरात सहा कृत्रिम तलाव आहेत. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना या संस्थेचे सदस्य पीओपीमुळे होणारे नुकसान आणि जलस्रोताचे संरक्षण याची देखील माहिती देत आहेत. त्यांचे कार्य पाहून सेवादल महिला महाविद्यालय आणि वैनगंगा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाचे विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले आहेत. याच फुटाळा तलावावरील दोन बाजू एका क्लबकडे सोपवण्यात आल्या असताना त्याठिकाणी मात्र कुणीही नाही. त्यामुळे त्या बाजूने नागरिक थेट तलावात विसर्जन करत आहेत.

तलावाची जबाबदारी आणि स्वयंसेवी संस्था

*    फुटाळा तलाव अमरावती मार्ग – रोटरी क्लब

*    फुटाळा तलाव चौपाटी – रोटरी क्लब

*    फुटाळा तलाव वायुसेना नगर – ग्रीन विजिल फाऊंडेशन

*      सक्करदरा तलाव – अरण्य पर्यावरण संस्था,

*     निसर्ग विज्ञान मंडळ, तुकोबा युवा संस्था, किंग कोब्रा संस्था

*      नाईक तलाव – जनजागृती समिती, सिंधू महाविद्यालय, हस्तशिल्पी

*      गांधीसागर तलाव – अरण्य पर्यावरण संस्था,

*      रोटरी क्लब, निसर्ग विज्ञान मंडळ

*      सोनेगाव तलाव – ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन

*      अंबाझरी ओव्हरफ्लो – वृक्ष संवर्धन समिती, रोटरी क्लब

*      रामनगर मंदिर – वृक्ष संवर्धन समिती