उपराजधानीतील रुग्णसंख्या ५६ वर, बहुतांश रुग्ण सतरंजीपुरा परिसरातील

नागपूर : उपराजधानीत मंगळवारी आणखी ९ नवीन करोनाचे रुग्ण आढळले असून येथील रुग्णसंख्या ५६ वर पोहचली आहे. यातील ३७ रुग्ण हे गेल्या पाच दिवसांतील असून बहुतांश रुग्णांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मरकजशी संबंध असून ते सतरंजीपुरा परिसरातील आहेत.

उपराजधानीत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बघता-बघता रुग्णसंख्या ५६ वर पोहचली आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी वृत्त लिहिस्तोवर नागपुरात सिंबॉयसिसमध्ये सक्तीच्या विलगीकरणात ठेवलेले ६ आणि आमदार निवासातील तिघांना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. बहुतांश रुग्ण हे सतरंजीपुरा परिसरातील आहेत. या रुग्णांत मेडिकलच्या प्रयोगशाळेत तीन तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)च्या प्रयोगशाळेत सहा जणांना या विषाणूची लागण असल्याचे तपासणीत निदान झाले.

ही माहिती कळताच प्रशासनाकडून तातडीने या सगळ्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले गेले. नऊ रुग्णांत पाच महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान हे सगळे सतरंजीपुराशी संबंधित असल्याने रुग्णालयांत त्यांच्याकडून आणखी ते किती लोकांच्या संपर्कात आले त्याची माहिती काढणे सुरू झाले आहे. इतरांचाही प्रशासनाकडून शोध सुरू झाला असून त्यांनाही खबरदारी म्हणून विलगीकरणात आणले जात आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी २३ हून अधिक रुग्ण हे सतरंजीपुराशी संबंधित असल्याने आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

दलालपुरा परिसर बंद

सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणारा दलालपुरा प्रभाग क्रमांक २१ येथे करोनाबाधित आढळल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून  हा संपूर्ण परिसर बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.या आदेशानुसार सतरंजीपुरा झोन क्रमांक ७ अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक २१ च्या दक्षिण-पश्चिमेस मस्कासाथ चौक, उत्तर-पश्चिमेस चकना चौक, उत्तर-पूर्वेस महाजन किराणा, पूर्वेस शिवशक्ती इनक्लेव, दक्षिण-पूर्वेस दहीबाजार पूल, दक्षिणेस रोकडे बिल्डींग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या परिसरात शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स, दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

करोनामुक्त होऊन तिघे घरी परतले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे यशस्वी उपचाराने करोनामुक्त होऊन तिघे जण मंगळवारी घरी परतल्याची माहिती, औषधशास्त्र विभागाचे डॉ. राजेश गोसावी यांनी दिली. परंतु त्यांना तेथेही खबरदारी म्हणून काही दिवस विलगीकरणात रहावे लागले. घरी परतलेल्यांमध्ये पक्षाघात असलेला जरीपटकातील रुग्णासह त्याची पत्नी व मुलाचा समावेश आहे. पक्षाघात असलेल्या रुग्णाने तो करोनाग्रस्त भावाच्या संपर्कात आल्याची माहिती लपवली होती.

मेयोत नवीन वार्ड

सध्या मेयो रुग्णालयात १८ करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे. मंगळवरी रुग्ण वाढल्यावर येथे आणखी ४ नवीन रुग्ण प्रशासनाकडून पाठवण्यात आले. त्यामुळे मेयो प्रशासनाने रुग्ण वाढत असल्याचे बघत या विषाणूच्या रुग्णांवर उपचारासाठी आणखी वार्ड क्रमांक ४ नवीन उपलब्ध केला आहे. पूर्वीच्या वार्डात सुमारे २५ रुग्णांना सामाजिक अंतर ठेवून उपचाराची सोय  होती.

एक वृद्ध व एका मुलीचा समावेश

करोनाची लागन झाल्याचे समोर आलेल्या सोमवारच्या रुग्णांत एक ७० वर्षीय वृद्ध आणि एका ८ वर्षीय मुलीचा समावेश आहे. सोबत ५०, ४५, ४५, १८ वर्षीय महिला संवर्गातील रुग्णांना आणि १९, २८, ५८ वर्षीय पुरूष संवर्गातील व्यक्तींनाही करोना असल्याचे पुढे आले आहे.

कळमन्यातील धान्य बाजार तीन दिवस सुरू राहणार

कळमना बाजार समितीतील गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील बाजारांची विभागणी करून ते सुरू ठेवण्याचे दिवस ठरवून दिले आहे.  आठवडय़ातील तीन दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धान्य व फळ बाजार सुरू राहणार असून सोमवार, बुधवार आणि रविवारी  कांदा, बटाटा आणि लसूण बाजार  सुरू राहणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मंगळवारी जारी केले आहे.