24 October 2020

News Flash

Coronavirus Outbreak : मध्यवर्ती कारागृहातही करोना!

एका अधिकाऱ्यासह नऊ जणांना बाधा; एकूण रुग्णसंख्या दीड हजाराच्या पलीकडे

संग्रहित छायाचित्र

एका अधिकाऱ्यासह नऊ जणांना बाधा; एकूण रुग्णसंख्या दीड हजाराच्या पलीकडे

नागपूर: उपराजधानीत दिवसभरात ३३ नवीन करोनाबाधितांची भर पडली असून त्यात येथील मध्यवर्ती कारागृहातील एका अधिकाऱ्यासह एकूण नऊ जणांचा समावेश आहे. या नवीन रुग्णांमुळे आजपर्यंत  शहरात आढळलेल्या एकूण रुग्णांच्या संख्येने तब्बल दीड हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

नवीन बाधितांमध्ये प्रथमच कारागृहातील अधिकारी, कर्मचारी असल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. कारागृहात या सगळ्यांसह एकूण १०५ जण ११ जूनला सेवेवर रुजू झाले होते. ते २६ जूनला १४ दिवस सेवा दिल्यावर येथून बाहेर पडले होते. सध्या येथे संक्रमण टाळण्यासाठी प्रत्येक १४ दिवसांत आळीपाळीने सेवा लावली जात आहे. यापैकी एका पोलीस शिपायाला  करोनाची लक्षणे होती. त्याची २७ जूनला खासगी प्रयोगशाळेत चाचणी केली असता त्याला करोना असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे  येथील २७ जणांचे नमुने तपासण्यात आले. यापैकी नऊ जणांना करोना असल्याचे स्पष्ट झाले.

यामुळे आज मंगळवारी कारागृहातील आणखी ७० जणांचे नमुने  घेण्यात आले.  त्यात १० ते १२  वृद्ध व मधुमेहासह इतर जोखमीच्या गटातील कैदी आहेत. या सगळ्यांचा अहवाल आल्यावरच  कारागृहात आणखी किती बाधित आहेत, हे स्पष्ट होईल.  कारागृह प्रशासनाने महापालिकेला येथील बाधितांच्या कुटुंबीयांच्या विलगीकरणासाठीची प्रक्रिया तातडीने करण्याची विनंती केली आहे. यासोबत  टिमकीतील १, झिंगाबाई टाकळी  १, रामटेक  १, कामठीच्या सैन्य रुग्णालयातील ८, मोमीनपुरा ५, मिनीमातानगर १, रामदासपेठ १, वनामती विलगीकरण केंद्र १, पाचपावली विलगीकरण केंद्र १ आणि इतर ठिकाणावरूनही काही जणांना करोना असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंत आढळलेल्या करोनाबाधितांची एकूण संख्या थेट १,५०५ वर पोहचली आहे.

कारागृहात सुमारे साडे अठराशे कैदी

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या साडेअठराशेच्या जवळपास कैदी ठेवण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी  सुमारे साडेसातशेच्या जवळपास कैद्यांना आपत्कालीन पॅरोलवर सोडण्यात आल्याने ही संख्या कमी आहे. परंतु येथील काही कैदी विषाणूबाधित आढळल्यास इतरांच्याही तपासणीची वेळ प्रशासनावर येणार आहे.

नवीन प्रतिबंधित परिसर

शहरात नव्याने पाच परिसर प्रतिबंधित करण्यात आले तर चार ठिकाणचे प्रतिबंध हटवण्यात आले. नवीन प्रतिबंधित क्षेत्रात पूर्व वर्धमाननगर भास्कर व्यास मैदानाजवळील भाटिया निवासस्थान ते मंदिर, माखेजा यांचे निवासस्थान, भोयर यांचे निवासस्थान ते मंदिर, लकडगंज झोनअंतर्गत पडोळेनगर झोपडपट्टी भागात पाठराबे ते लारोकर यांचे घर, जगताप यांचे निवासस्थान, नागनदी संरक्षण भिंत आणि लारोकर यांचे निवासस्थान, लकडगंज झोनअंतर्गत सतनामीनगर मैदानाअंतर्गत वाघ निवासस्थान ते कृष्णलाल खुंगर यांचे निवासस्थान, हिरालाल अमृते व त्रिवेदी यांचे निवासस्थान आणि धंतोली झोनमध्ये भीमनगर गल्ली क्रमांक १ परिसर बंद करण्यात आला आहे. गांधीबाग झोनमध्ये इतवारी टांगा स्टँड, हत्तीनाला भुजाडे मोहल्ला, मंगळवारी झोनमध्ये गड्डीगोदाम, धरमपेठ झोनमध्ये सदर काटोल रोड, नेहरूनगर झोनमध्ये गोपालकृष्ण नगर वाठोडा, आशीनगर झोनमध्ये न्यू इंदोरा, धंतोली झोनमध्ये रामेश्वरी रोड, आशीनगर झोनमध्ये हबीबनगर, गांधीबाग झोनमध्ये सेवासदन चौक व सैफीनगर या प्रतिबंधित भागात आता  बाधित नसल्यामुळे ते मुक्त करण्यात आले आहे.

पाच महिन्यांची गर्भवती करोनामुक्त

वर्धमाननगरच्या एका ५ महिन्यांच्या गर्भवतीलाही करोनाची बाधा असल्याने २१ जूनला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी ती करोनामुक्त झाल्यावर तिला मेडिकलमधून सुट्टी दिली गेली. तिच्यासह गर्भातील बाळ सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.  मंगळवारी शहरात एकूण ५८ जण करोनामुक्त झाले. त्यात मेडिकलचे ४१, मेयोतील ७, एम्सच्या १० जणांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरात करोनामुक्त झालेल्यांची संख्या एकूण १,३०९ वर पोहचली आहे.

‘सारी’चा एक बळी

मेडिकलच्या ‘सारी’ वार्डात उपचार घेणाऱ्या एका ५० वर्षीय गोंदियातील व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचे नमुने करोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. परंतु अहवाल नकारात्मक आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 3:13 am

Web Title: nine people including an officer from central jail tested covid 19 positive zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 रुग्णाच्या नकारामुळे पहिल्या रक्तद्रव्य उपचाराचा मुहूर्त टळला
2 मराठी सक्तीच्या आदेशानंतरही टाळेबंदीची अधिसूचना इंग्रजीत
3 Ashadi Ekadashi 2020 : घरच्या ‘पंढरी’तच विठूरायाचे नामस्मरण!
Just Now!
X