*  अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांची हजेरी *   शनिवारी सत्कार, चित्रपट कलावंतही येणार

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ६१व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. त्यांच्या षष्ठब्दीपूर्तीनिमित्त २७ मे रोजी कस्तुरचंद पार्कवर जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह केंद्र आणि राज्यातील विविध पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, उद्योजक आणि चित्रपट सृष्टीतील कलावंत हजेरी लावणार आहेत.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अघ्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेली सत्कार समिती स्थापन करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहाण, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री सुभाष देसाई यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि सिनेसृष्टीतील कलावंत उपस्थित राहणार आहेत.

व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी, पत्रकार आणि सामान्य लोकांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी वेगवेगळे प्रवेशद्वार करण्यात आले आहेत. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त विदर्भातील विविघ जिल्ह्य़ात आरोग्य शिबीर, महिलांसाठी स्तन कॅन्सर शिबीर, दिव्यांगांना साहित्य वाटप, वृक्षलागवड आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, या सत्कार सोहळ्याआधी सायंकाळी ५.३० वाजता प्रसिद्ध गायक सुदेश भोसले आणि वैशाली सामंत यांचा सुमधूर हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर ७ वाजता सत्कार सोहळा सुरू होईल. पत्रकार परिषदेला गिरीश गांधी, शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, संदीप जोशी, प्रवीण दटके उपस्थित होते.

नितीन गडकरी यांना वाढदिवसानिमित्त त्यांना भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार, खासदार आणि कार्यकर्ते मिळून १ कोटी १ लाखाची थैली अर्पण करणार आहेत. प्रत्येक आमदार आणि खासदार यांनी त्यासाठी १ लाख दिले असून हा सर्व निधी शासकीय अनुदानावर न चालणाऱ्या समाजातील विविध सामाजिक संस्थांना देणार असून त्याची घोषणा ते सत्कार सोहळ्याच्या वेळी करतील.

[jwplayer 5DuZiDV1]

या सत्कार सोहळ्याला ५० हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित राहण्याची शक्यता बघता सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजतापासून कस्तुरचंद पार्ककडे येणारे सर्व रस्ते बंद केले जाणार आहेत. वर्धा मार्गाने येणारी वाहने गोवारी स्मारकाजवळ, कामठीकडून येणारी वाहने स्मृती टॉकीज, एलआयसी बिल्डींगजवळ, सिव्हिल लाईनकडून येणारी वाहने आकाशवाणी चौक व गांधीबागकडून येणारी वाहने स्टेट बँकेजवळ अडविण्यात येणार आहेत. या स्थानावरून लोकांना पायदळ सभास्थानी यावे लागणार आहे. पार्किंगसाठी बिशप कॉटन मैदान, महापालिका मुख्यालय, जुने कॅथलटिक चर्च, सरपंच भवन, हिस्लॉप कॉलेज, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, तिडके महाविद्यालय, टायगर गॅप ग्राऊंड सदर, स्टेट बँक मुख्यालय, रेल्वे स्टेशन, रेल्वे डीआरएम कार्यालय, सेंट उर्सुला, ऑलसेंट कॅथ्रेडल, नागपूर विद्यापीठ परिसर या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.