केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मेहुणे किशोर कमलाकर तोतडे यांच्याकडे अकरा महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी सर्व अंगाने तपास केला असतानाही आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे किशोर तोतडे यांच्याकडे चोरी करणारा किंवा करविणारा ‘घर का भेदी’ असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

किशोर तोतडे हे गडकरींचे सख्खे मेहुणे आहेत. पूर्ती सोलर कंपनीचे ते सर्वेसर्वा आहेत. ते पत्नी व मुलासोबत पांडे लेआऊट येथील रघुकमल अपार्टमेंटमध्ये राहात होते. किशोर हे १७ एप्रिल २०१५ ला बाहेरगावावरून रेल्वेने नागपुरात परतले होते. त्यामुळे दुपारी १.३० वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी घराला कुलूप लावून पतीला घ्यायला रेल्वेस्थानकावर गेल्या होत्या. ते घरी परत येईपर्यंत घरात चोरी झालेली होती. त्यांच्या घरातून ९० तोळे सोन्याचे दागिने, अनेक किलो चांदी आणि विदेशी चलनाच्या नोटा लंपास करण्यात आल्या होत्या. त्याच दिवशी पोलीस आयुक्त शारदाप्रसाद यादव यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला होता. केंद्रीय मंत्र्यांच्या मेहुण्याकडे चोरी झाल्याने नागपूर शहर पोलिसांसमोर प्रकरणाचा छडा लावण्याचे नवीन आव्हान उभे ठाकले. या घटनेला आज अकरा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. राणाप्रतापनगर पोलीस आणि गुन्हे शाखा पोलिसांनी शहरातील व शहराबाहेरील सर्व सराईत चोर आणि दरोडेखोरांची चौकशी केली. या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्याकडील नोकर, वाहनचालक, घरगडी आदींचीही कसून चौकश केली, परंतु कोणाकडूनही काहीच पुरावे सापडले नाहीत.

तोतडेंनी घर बदलले

या घटनेचा तोतडे कुटुंबीयांनी चांगलाच धसका घेतला आहे. यानंतर त्यांनी पांडे लेआऊट येथील घर सोडले आणि धरमपेठ येथे घर बांधले. घटनेच्या काही दिवसांनीच तोतडे कुटुंबीयांनी जुने घर सोडून नवीन घरी प्रवेश केला. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ठराविक कालावधीनंतर पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतात, हे विशेष.

चोरांना सर्व माहिती होती

तोतडे यांच्या घराच्या किल्ल्या कुठे असतात, कपाटातील कोणत्या रकान्यात दागिने आणि मौल्यवान वस्तू आहेत, या सर्व बाबींची माहिती चोरटय़ांना होती. त्यामुळे चोरांना तोतडेंच्या परिचयातील व्यक्तीने टीप दिली असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने सर्वप्रथम पोलिसांनी घरकाम करणारी महिला, घरगडी आणि चालकांची कसून चौकशी केली. आजही पोलीस त्यांच्यावर नजर ठेवून आहेत, परंतु त्यांच्या परिस्थितीमध्ये किंवा राहणीमानात कोणताही बदल झाला नसल्याची माहिती आहे.

मंत्र्यांच्या भीतीमुळे कुटुंबीयांची चौकशी नाही

किशोर तोतडे यांच्या कुटुंबातील आणि परिचयातील काहींवर पोलिसांना संशय आहे. त्यांची चौकशी केल्यास केंद्रीय मंत्री नाराज होतील आणि अनावश्यक त्रास होण्याच्या भीतीमुळे पोलीस त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करीत नसल्याची माहिती मिळत आहे.